For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

उन्हाळी हंगामासाठी धावणार बसेस

11:40 AM Apr 04, 2024 IST | Tarun Bharat Portal
उन्हाळी हंगामासाठी धावणार बसेस
Advertisement

सुट्या, यात्रा-जत्रांमुळे प्रवासी संख्येत वाढ : परिवहन महामंडळासमोर डोकेदुखी

Advertisement

बेळगाव : सुट्या, लग्नसराई आणि पर्यटनामुळे प्रवाशांच्या संख्येत झपाट्याने वाढ होवू लागली आहे. त्यामुळे बससेवेवर ताण वाढू लागला आहे. आधीच शक्ती योजनेमुळे बससेवेचे तीनतेरा वाजले आहेत. त्यातच उन्हाळी हंगामातील वाढत्या प्रवाशांमुळे परिवहनची डोकेदुखी वाढणार आहे. शिवाय निवडणुकीसाठीदेखील काही बसेस उपलब्ध करून द्याव्या लागणार आहेत. त्यामुळे परिवहन कशा पद्धतीने नियोजन करणार हेच पहावे लागणार आहे. शाळांना सुटी पडल्यामुळे कुटुंबांसह मूळगावी आणि पर्यटनासाठी बाहेर पडणाऱ्या प्रवाशांची संख्या वाढणार आहे. कोल्हापूर, पुणे, मुंबई, बेंगळूर, तिरुपती, गोवा आदी ठिकाणी पर्यटनासाठी जाणाऱ्या प्रवाशांची संख्या अधिक असते. त्यामुळे या मार्गावर जादा बस सोडाव्या लागणार आहेत. यंदा शक्ती योजनेमुळे महिलांचा मोफत प्रवास सुरू आहे. त्यामुळे बससेवेवर ताण वाढणार आहे. आधीच परिवहनच्या ताफ्यात बसचा तुटवडा आहे. परिणामी यंदाचा उन्हाळी हंगाम परिवहनसाठी तापदायक ठरणार आहे.

यात्रा-जत्रा अन् लग्नसराई

Advertisement

यात्रा-जत्रा आणि लग्नसराईची धामधूम सुरू होणार आहे. त्यामुळे शहरासह लांब पल्ल्यासाठीदेखील धावणाऱ्या बसेसवर प्रवाशांचा अतिरिक्त ताण वाढणार आहे. बिजगर्णी, कावळेवाडी, सांबरा आदी गावातील महालक्ष्मी यात्रा तोंडावर आल्या आहेत. परिवहनच्या ताफ्यातच बसेसची कमतरता असल्याने अधिक महसुलापासून परिवहनला दूर रहावे लागणार आहे. बेळगाव विभागात रामदुर्ग, खानापूर आणि सौंदत्ती आगाराचा समावेश आहे. यापैकी एका बेळगाव आगारात सर्वाधिक महसूल प्राप्त होतो. आंतरराज्य प्रवासासाठी धावणाऱ्या बसमधून बेळगाव आगाराला दैनंदिन 40 टक्के उत्पन्न प्राप्त होते.

प्रवाशांच्या मागणीनुसार बसेस उपलब्ध

प्रवाशांच्या मागणीनुसार यात्रा-जत्रा आणि पर्यटनाला बसेस उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. निवडणुकीसाठी अद्याप बसेसची मागणी झाली नाही. शक्ती योजनेतून प्रवास करणाऱ्या महिलांची संख्या वाढली आहे. मात्र उन्हाळी हंगामासाठी विशेष बससेवा पुरविल्या जाणार आहेत.

- ए. वाय. शिरगुप्पीकर, डेपो मॅनेजर

Advertisement
Tags :

.