बस तिकीट दरवाढीचे संकेत
परिवहन महामंडळाकडून 25 टक्के दरवाढीचा राज्य सरकारला प्रस्ताव
प्रतिनिधी/ बेंगळूर
राज्य परिवहन महामंडळाकडून बस तिकीट दरवाढ होण्याची दाट शक्यता आहे. तिकीट दरात 25 टक्के वाढ करण्यासंबंधी परिवहन महामंडळाच्या सर्व निगमकडून राज्य सरकारकडे प्रस्ताव देण्यात आला आहे. परिवहनमंत्री रामलिंगारेड्डी यांनी बस तिकीट दरवाढीचे संकेत दिलो आहेत. प्रस्तावावर अद्याप निर्णय घेतलेला नाही. सर्वकाही पडताळून जनतेवर बोजा न टाकता निर्णय घेण्यात येईल, असे सांगितले आहे.
परिवहन मंत्र्यांनी दिलेल्या संकेतानुसार येत्या काही दिवसांत बस तिकीट दरात वाढ होण्याची शक्यता आहे. परिवहनच्या सर्व निगमने राज्य सरकारकडे 25 टक्के तिकीट दरवाढीचा प्रस्ताव सादर केला असला तरी इतक्या प्रमाणावर दरवाढीला संमती देण्याची शक्यता कमी आहे. 12 ते 15 टक्क्यांनी तिकीट दरवाढीला संमती दिली जाऊ शकते.
राज्य सरकारने गेल्या जूनमध्ये पेट्रोल-डिझेलवरील विक्रीकर 3 रुपयांनी वाढविला होता. आता बसच्या सुट्या भागांच्या किमती वाढल्या आहेत, परिवहन निगमच्या व्यवस्थापन खर्च, वाहनांचा देखभालीचा खर्च, कर्मचाऱ्यांचे वेतनही वाढले आहे. या सर्व बाबींचा विचार करता बस तिकीट दरवाढ अनिवार्य असल्याचे संकेत मंत्री रामलिंगारेड्डी यांनी दिले आहेत.
विजेप्रमाणे दरवर्षी बस तिकीट दरवाढ केल्यास जनतेवर बोजा पडणार नाही. मात्र गेल्या चार वर्षांपासून बस तिकीट दरांत वाढ झालेली नाही. बेंगळूर शहर परिवहन मंडळाच्या कार्यक्षेत्रात 2014 मध्ये तिकीट दरवाढ झाली होती, असेही त्यांनी सांगितले आहे. दरवाढ झाल्यास परिवहनला अधिक उत्पन्न मिळेल. यातून परिवहन संस्थेला लाभदायक स्थितीत आणता येईल, असा विचार परिवहन मंत्र्यांनी चालविला आहे.