बससेवा विस्कळीत : विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ
खानापूर आगाराच्या अनागोंदी कारभाराचा विद्यार्थ्यांना फटका : लोकप्रतिनिधीचे सोयीस्कर दुर्लक्ष
खानापूर : खानापूर बस आगाराचा अनागोंदी कारभाराचा फटका विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणात बसत आहे. विद्यार्थी आपल्या वेळेत शाळेत तसेच महाविद्यालयात पोहोचण्यासाठी मिळेल त्या बसमधून धोका पत्करुन प्रवास करत आहेत. गेल्या अनेक महिन्यांपासून मागणी करूनदेखील खानापूर बस आगाराचा कारभार काही सुधारलेला नाही. लोकप्रतिनिधींचेही साफ दुर्लक्ष झालेले आहे. तसेच राजकीय नेते, समाजसेवक यांनीही बस व्यवस्थापनाकडे सोयीस्कर दुर्लक्ष केल्याने विद्यार्थ्यांना वालीच नसल्याचे चित्र निर्माण झाले आहे. एखाद्या विद्यार्थ्याचा बळी गेल्यानंतरच यंत्रणा आणि सामाजिक भान जागे होणार का, अशी तीव्र प्रतिक्रिया पालकांतून व्यक्त होत आहे.
शहरात हायटेक बसस्थानकाची निर्मिती करण्यात आली आहे. मात्र हे बसस्थानक आणि आगार फक्त शोभेची वास्तू बनली आहे. बस आगारात एकही नवीन बस नाही. तसेच आगाराला आवश्यक असणाऱ्या बस उपलब्ध नसल्याने संपूर्ण ग्रामीण भागातील बससेवा कोलमडली आहे. एकाही गावात सुरळीत बससेवा नसल्याने नागरिकांसह विद्यार्थ्यांचे अतोनात हाल होत आहेत. तसेच वेळेत बससेवा नसल्याने विद्यार्थ्यांचे प्रचंड शैक्षणिक नुकसान होत आहे. विद्यार्थी धोका पत्करुन लेंबकळत बसप्रवास करत आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणापेक्षा प्रवासच नकोसा झाला आहे.
शासनाच्या योजनांमुळेही बसमध्ये तुडूंब गर्दी असते. त्यामुळे विद्यार्थ्याना बसमध्ये प्रवेशच मिळत नाही. विद्यार्थी शाळेत व महाविद्यालयात वेळेवर पोहचण्यासाठी गर्दी असलेल्या बसमधूनच धोका पत्करुन प्रवास करत आहेत. खानापूर आगाराचे ग्रामीण भागातील दळणवळणाचे वेळापत्रक पूर्णपणे कोलमडले आहे. एकाही विभागात वेळेवर बस सोडण्यात येत नाही. तसेच एकही बस उत्तम स्थितीत नसल्याने संपूर्ण बस आगाराचा कारभारच रामभरोसे चालला आहे. आगारप्रमुख तसेच अधिकाऱ्यांचा बेजबाबदारपणाचा कळस गाठलेला आहे.
विचारणा करणाऱ्या सामान्य नागरिकांना आगार व्यवस्थापक आणि कर्मचाऱ्यांकडून अरेरावीची उत्तरे देवून पाठवण्यात येते. याबाबत अनेकवेळा पालकांनी आणि नागरिकांनी लोकप्रतिनिधींकडे तक्रार केलेली आहे. मात्र याबाबत लोकप्रतिनिधीनी एकदाही गांभीर्याने घेतलेले नाही. त्यामुळे आगार प्रमुखांचा मनमानी कारभार सुरू आहे. तालुक्यातील संपूर्ण बस व्यवस्था कोलमडली आहे. त्याचे परिणाम सामान्य नागरिक आणि विद्यार्थ्यांना भोगावे लागत आहेत. लोकप्रतिनिधी, सामाजिक व राजकीय नेते, कार्यकर्त्यांनी आगाराचे व्यवस्थापन सुरळीत होण्यासाठी क्रम घ्यावेत, अशी मागणी पालकांतून होत आहे.