बसने घेतले दोन युवकांचे बळी
दोन्ही युवक गोकुल्डेचे, गावावर शोककळा : युवकांना ठोकरुन बसचालकाचे कर्नाटकात पलायन
कुंकळ्ळी : राष्ट्रीय महामार्गावर पाडी-बार्से येथे धोकादायक वळणावर बंगळुरु येथे निघालेल्या आनंद ट्रॅव्हल्स या बसची स्कूटरला धडक बसल्याने स्कूटरचालक दिलीप मोलू वेळीप (वय 38) व पाठीमागे बसलेला संदेश सुरेश गावकर (वय 27) या गोकुल्डे-बार्से येथील रहिवासी असलेल्या दोघांनाही मृत्यू आला. हे दोघेही रस्त्यावर फेकले गेल्याने जबर जखमी झाले होते. अत्यवस्थ स्थितीत त्यांना मडगावच्या जिल्हा इस्पितळात नेत असताना दिलीपला वाटेतच मृत्यू आला. त्यानंतर संदेशलाही मडगावला पोहोचता पोहोचता मृत्यू आला. पोलिसांकडून व स्थानिकांकडून मिळालेल्या माहितीनुसार, हा अपघात बुधवारी रात्री 8.30 च्या सुमारास एका धोकादायक वळणावर झाला. दिलीप व संदेश हे दोघे नातेवाईकांच्या वाढदिवसाला म्हणून सुबदळेच्या दिशेने निघाले होते. मात्र पाडी येथील सदर वळणावर समोरून येणाऱ्या आंतरराज्य बसची चालकाच्या बाजूने मागील बाजू त्यांना धडकली. त्यामुळे दोघेही फेकले गेले. दिलीप हा रस्त्याच्या बाजूने असलेल्या बॅरिकेडवर आदळून त्या जागी पडलेला आढळला, तर संदेश हा डोके रस्त्यावर आपटलेल्या स्थितीत दिसून आला. या घटनेनंतर बसचालकाने थांबून झालेली हानी पाहण्याचे सोडून बससह पलायन केले.
स्थानिकांच्या सतर्कतेमुळे अपघात उघड
याचवेळी पाडी येथील काही लोक जवळच्या गावातील घरगुती कार्यक्रमाला निघाले होते. त्यांच्या सतर्कतेमुळे हा अपघात बसमुळे झाल्याचे लक्षात येऊन बसचालकाला अटक करणे शक्य झाले. सदर बसचा चालक खाली उतरून बसला मागील बाजूने काही थडकले आहे का हे पाहताना त्यांना दिसला होता. पुढे गेल्यावर त्यांना रस्त्यावर पडलेले दिलीप व संदेश दिसले. त्यांनी त्वरित याची माहिती कुंकळ्ळी पोलिसांना फोनवरून देताच कुंकळ्ळी पोलिसस्थानकावरील उपनिरीक्षक आदित्य सावंत इतर पोलिसांसह पोहोचले. दरम्यान, सदर लोकांपैकी काहींनी पोळे येथील चेकनाक्यावरील आपल्या ओळखीच्या काही पोलिसांशीही संपर्क साधला.
यल्लापूर येथे अडविली बस
पोलिसांना आधी हा स्वयंअपघात असल्याचा संशय आला होता. मात्र वरील लोकांनी हा अपघात बसमुळे झाल्याचे ठासून सांगून बसचा पिवळा रंग अपघातग्रस्त स्कूटरला लागलेला आहे याकडे लक्ष वेधले. त्यानंतर उपनिरीक्षक सावंत यांच्या नेतृत्वाखालील पथकाने सदर बस पकडण्याच्या उद्देशाने माग काढण्याची मोहीम सुरू केली. पोळे चेकनाक्यावर पोहोचताच सदर बस सीमा ओलांडून कर्नाटकात पोहोचली असल्याची माहिती त्यांना मिळाली. त्यानंतर खासगी वाहन घेऊन त्यांनी कर्नाटकात प्रवेश केला व यल्लापूर पोलिसांची मदत घेऊन बुधवारी रात्री 11.30 च्या सुमारास अपघातग्रस्त बस यल्लापूर येथे अडविली. त्यानंतर कुंकळ्ळी पोलिसांनी बस ताब्यात घेऊन गुरुवारी पहाटे 5.30 वा. कुंकळ्ळी पोलिसस्थानकावर आणली.
बसचालकास अटक
बसचा चालक राजेश शिवर्ली (52) हा शिरवई-केपे येथे राहणारा असून तो मूळ कर्नाटकचा आहे. त्याच्यावर गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे, अशी माहिती पोलिसांकडून देण्यात आली. बसची धडक बसली असल्याचे या चालकाला कळले होते, असे प्राथमिक तपासात दिसून आले आहे. मात्र आपल्याला मारहाण होईल या भीतीने आपण तेथून काढता पाय घेतल्याचे त्याने सांगितले असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. पण भीती वाटल्यास काणकोण पोलिसस्थानकावर जाऊन तिथे बसचालकाला परिस्थितीची कल्पना देता आली असती. अपघाताची कल्पना कुणालाही लगेच न आल्याने काही वेळ वरील दोन्ही युवक गंभीर जखमी अवस्थेत रस्त्यावर पडून राहिले. कदाचित वेळीच हालचाली झाल्यास त्यांना वाचवता आले असते, अशा प्रतिक्रिया स्थानिकांमधून व्यक्त होत आहेत. कुंकळ्ळी पोलिसस्थानकाचे निरीक्षक डायगो रॉड्रिग्ज यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास चालू आहे.
गोकुल्डे गावावर शोककळा
मयत दिलीप व संदेश यांच्यावर गोकुल्डे येथे गुरुवारी सायंकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले. या घटनेने गोकुल्डे गावावर शोककळा पसरली असून मोठ्या संख्येने गावकरी अंत्यसंस्कारावेळी हजर होते. दिलीप हा मोबोर येथील एका हॉटेलात चालक म्हणून कामाला होता. त्याच्या पश्चात पत्नी आणि दोन मुली व एक मुलगा असा परिवार आहे. या घटनेमुळे या परिवारावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. संदेश हा अविवाहित होता आणि अलीकडेच कृषी मित्र म्हणून पाडी-बार्से पंचायतीत काम हाताळू लागला होता.