For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

बेळगाव-कोल्हापूर मार्गावर बसफेऱ्या विस्कळीत

10:08 AM Jun 14, 2024 IST | Tarun Bharat Portal
बेळगाव कोल्हापूर मार्गावर बसफेऱ्या विस्कळीत
Advertisement

बसफेऱ्यांची संख्या कमी झाल्याने प्रवाशांची गैरसोय, विद्यार्थ्यांचे हाल

Advertisement

बेळगाव : बेळगाव-कोल्हापूर या मार्गावर बसफेऱ्या कमी झाल्याने प्रवाशांची गैरसोय होऊ लागली आहे. विशेषत: प्रवाशांना बससाठी तासन्तास ताटकळत थांबावे लागत आहे. बेळगाव-कोल्हापूर मार्गावर दहा मिनिटाला एक फेरी होती. मात्र आता एक तासानंतरही बस मिळत नसल्याने प्रवाशांचे हाल होऊ लागले आहेत. बेळगाव-कोल्हापूर या आंतरराज्य मार्गावर प्रवाशांची मोठी वर्दळ आहे. विशेषत: हत्तरगी-संकेश्वर, निपाणी आणि कागल बसस्थानकाला हा जोडणारा मार्ग असल्याने प्रवासी संख्या मोठी आहे. मात्र या मार्गावर बेळगाव आगारातून धावणाऱ्या बसफेऱ्यांची संख्या कमी झाली आहे. त्यामुळे प्रवाशांची हेळसांड होताना दिसत आहे. प्रवाशांना इतर आगारातील बसेसवर अवलंबून रहावे लागत आहे. बसफेऱ्या कमी असल्याने बसेस फुल्ल भरून धावू लागल्या आहेत. प्रवाशांना चेंगराचेंगरी करत प्रवास करावा लागत आहे. बेळगाव मध्यवर्ती बसस्थानकातून कोल्हापूर मार्गावर बसफेऱ्या वाढवाव्यात, अशी मागणीही होत आहे. बेळगाव-कोल्हापूर असा दैनंदिन प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठी आहे. त्याचबरोबर नोकरी आणि इतर कामानिमित्त ये-जा करणारे प्रवाशीही अधिक आहेत. काही नोकरदार कामगारांनी बसपासही काढले आहेत. मात्र बसफेऱ्यांची संख्या घटल्याने प्रवाशांचे हाल होत आहेत. हत्तरगी, निपाणी, संकेश्वर परिसरातील प्रवाशांना खासगी वाहनाने प्रवास करावा लागत आहे. महिलांचा शक्तीअंतर्गत मोफत प्रवास सुरू असल्याने प्रवासी संख्येत मोठी वाढ झाली आहे. त्या तुलनेत बसेसची कमतरता असल्याने विविध मार्गांवर बसेसचा तुटवडा निर्माण होत आहे.

भाविकांची गैरसोय 

Advertisement

वाडीरत्नागिरी येथील जोतिबा देवस्थानला दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांची संख्या वाढली आहे. नवविवाहित दाम्पत्ये देवदर्शनासाठी जात आहेत. मात्र बेळगाव-कोल्हापूर मार्गावरील बसफेऱ्याच विस्कळीत झाल्याने भाविकांचीही गैरसोय होऊ लागली आहे. याचा फायदा खासगी वाहने घेऊ लागली आहेत.

विद्यार्थ्यांची गैरसोय

बेळगाव-कोल्हापूर मार्गावर बसफेऱ्या विस्कळीत झाल्याने विशेषत: विद्यार्थ्यांची गैरसोय होऊ लागली आहे. कोल्हापूर, निपाणी, संकेश्वर, हतरगी, यमकनमर्डी येथून बेळगावला येणाऱ्या विद्यार्थीवर्गाची संख्या मोठी आहे. मात्र या मार्गावरील बसफेऱ्या अनियमित झाल्याने विद्यार्थ्यांची गैरसोय होत आहे. विद्यार्थ्यांना बसपास असूनदेखील आर्थिक भुर्दंड बसू लागला आहे.

Advertisement
Tags :

.