बसफेऱ्या नगण्य, प्रवाशांचे हाल
धोकादायक प्रवास सुरूच, बसचा तुटवडा
प्रतिनिधी/ बेळगाव
शहर आणि ग्रामीण भागात बसफेऱ्यांची संख्या कमी झाल्याने प्रवासी आणि विद्यार्थ्यांचा प्रवास जीवघेणा ठरू लागला आहे. बसच्या प्रतीक्षेत प्रवाशांना तासन्तास ताटकळत थांबावे लागत आहे. शक्ती योजना सुरू झाल्यापासून बस व्यवस्थेचे तीनतेरा वाजले आहेत. त्यामुळे बसफेऱ्यांमध्ये विद्यार्थ्यांची आणि प्रवाशांची मात्र फरफट सुरू आहे. याबाबत परिवहनला कोणतेच गांभीर्य नसल्याचे दिसत आहे. त्यामुळे दैनंदिन विद्यार्थ्यांचा प्रवास दरवाजाला लोंबकळत सुरू असल्याचे दिसत आहे.
दररोज शहरांतर्गत 142 हून अधिक बसेस धावू लागल्या आहेत. मात्र यामध्ये आयुर्मान संपलेल्या बसेसची संख्यादेखील अधिक आहे. त्यामुळे रस्त्यात बस बंद पडण्याचे प्रकार वाढू लागले आहेत. बस वाहतुकीवर याचा परिणाम होऊ लागला आहे. आधीच सार्वजनिक बस वाहतूक विस्कळीत झाली आहे. त्यातच परिवहनच्या ताफ्यात जुन्या आयुर्मान संपलेल्या बसेसची संख्या अधिक आहे. त्यामुळे दैनंदिन बस व्यवस्थापन विस्कळीत होऊ लागले आहे.
बसेसची कमतरता, बस फेऱ्या कमी आणि इतर कारणांमुळे शहरातील प्रवाशांची हेळसांड होऊ लागली आहे. दिवाळीमुळे प्रवाशांच्या संख्येत दुप्पटीने वाढ झाली आहे. मात्र या तुलनेत बसफेऱ्या कमी असल्याने प्रवाशांची गैरसोय होत आहे. शक्तीयोजनेमुळे महिलांच्या संख्येत वाढ झाली आहे. त्यामुळे बसेस फुल्ल होऊन धावू लागल्या आहेत. परिणामी वयोवृद्ध आणि बालकांची गर्दीत घुसमट होऊ लागली आहे.
शहरातील आरपीडी कॉर्नर, धर्मवीर संभाजी चौक, चन्नम्मा चौक, सम्राट अशोक चौक, गोवावेस आदी ठिकाणी प्रवाशांची गर्दी पहावयास मिळत आहे. विशेषत: सकाळ आणि सायंकाळच्या वेळेत प्रवाशांचे हाल होत आहेत. नोकरदार, कामगार आणि विद्यार्थी सकाळी व सायंकाळच्या वेळेत प्रवास करतात. मात्र यावेळेत बस नसल्याने रात्री उशिरापर्यंत ताटकळत थांबावे लागत आहे. यामध्ये विद्यार्थ्यांची अधिक हेळसांड होत आहे. रात्री घरी पोहोचायला उशीर होत आहे.
परिवहनने सरकारकडे नवीन बससाठी प्रस्ताव दिला आहे. मात्र राज्य सरकारकडून अद्याप नवीन बसेस दाखल झाल्या नाहीत. त्यामुळे आहेत त्या बसवर परिवहनचा गाडा सुरू आहे. मात्र प्रवासीसंख्येत वाढ झाल्याने सद्यस्थितीत असलेल्या बससेवेवर ताण वाढला आहे. त्यामुळे प्रवाशांची विविध मार्गांवर गैरसोय होत आहे. काही प्रवाशांना खासगी वाहनांनीच इच्छितस्थळी जावे लागत आहे. तर काही ठिकाणी संधीचा फायदा घेत खासगी वाहनांकडून आर्थिक लूटही केली जात आहे.