For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

उन्हाळी सुटीमुळे बस बुकिंगला वाढला प्रतिसाद

10:43 AM Apr 19, 2024 IST | Tarun Bharat Portal
उन्हाळी सुटीमुळे बस बुकिंगला वाढला प्रतिसाद
Advertisement

प्रवाशांच्या संख्येत वाढ : लांब पल्ल्यासाठीही धावताहेत बसेस

Advertisement

बेळगाव : शाळांना उन्हाळी सुटी सुरू झाल्याने प्रवाशांच्या संख्येत वाढ झाली आहे. लांब पल्ल्याच्या प्रवाशांची संख्या वाढू लागली आहे. त्यामुळे ऑनलाईन बुकिंगसाठी देखील प्रतिसाद वाढू लागला आहे. त्यामुळे बसस्थानकातील तिकीट बुकिंग काऊंटरवर प्रवाशांची गर्दी होऊ लागली आहे. त्याबरोबर उन्हाळी पर्यटनासाठी देखील प्रवासी बाहेर पडू लागले आहेत. पुणे, नाशिक, कोल्हापूर, बेंगळूर, म्हैसूर, हैदराबाद, तिरुपती, गोवा आदी ठिकाणाहून ये-जा करणाऱ्या प्रवाशांची संख्या वाढली आहे. नोकरदार, कामगार उन्हाळी सुटीमुळे कुटुंबासह मूळ गावी परतू लागले आहेत. यासाठी परिवहनने देखील जादा बसेसची सोय केली आहे. त्याबरोबर वातानुकूलित बससेवादेखील उपलब्ध केली आहे. वाढत्या प्रवाशांच्या संख्येमुळे महसूल देखील वाढू लागला आहे. त्यातच यात्रा-जत्रा, लग्नसराई आणि निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. त्यामुळे स्थानिक प्रवाशांची संख्याही वाढताना दिसत आहे.

दैनंदिन 650 हून अधिक बसेस विविध मार्गांवर धावतात. त्यामुळे प्रवाशांना विविध मार्गांवर बसेस उपलब्ध होतात. मात्र, शक्ती योजनेमुळे प्रवासी संख्येत दुपटीने वाढ झाली आहे. त्यामुळे काही ठिकाणी बसेसची कमतरता जाणवू लागली आहे. उन्हाळी सुटीत देवदर्शन आणि पर्यटनासाठी बाहेर पडणाऱ्यांची संख्या वाढू लागली आहे. त्यामुळे कोल्हापूर, जोतिबा, सौंदत्ती यल्लम्मा यासह तिरुपती बालाजी आदी ठिकाणी जाणाऱ्या भक्तांची संख्या वाढली आहे. त्यामुळे बसस्थानकात आगाऊ बुकिंगलाही प्रतिसाद वाढू लागला आहे. बेळगाव आगारात रामदुर्ग, खानापूर विभागाचा समावेश आहे. विशेषत: बेळगाव आगाराला गोवा आणि महाराष्ट्राची हद्द लागून आहे. त्यामुळे राज्यात सर्वाधिक महसूल हा बेळगाव विभागातून उपलब्ध होतो. मात्र, बेळगाव विभागातच बसेसचा तुटवडा निर्माण झाला आहे. परिवहनच्या ताफ्यात येणाऱ्या नवीन बसही थांबल्या आहेत. त्यामुळे उन्हाळी हंगामात बसेसचे नियोजन करताना परिवहनचे तीनतेरा वाजू लागले आहेत. उन्हाळी हंगामात यात्रा-जत्रा, लग्नसराई, पर्यटन आदी ठिकाणी बस पाठवताना परिवहनची डोकेदुखी वाढली आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.