बसमधील धमाक्यांनी इस्रायल हादरले
तीन ठिकाणी स्फोट : दहशतवादी हल्ल्याचा संशय : जीवितहानी नाही ,पंतप्रधान नेतन्याहू यांनी बोलावली आपत्कालीन बैठक
वृत्तसंस्था/ जेरुसलेम
मध्य इस्रायलमधील बॅट याम शहरात झालेल्या स्फोटांनी देश हादरला आहे. बसमध्ये झालेल्या या धमाक्यांमध्ये कोणीही जखमी झाले नाही परंतु हा मोठा दहशतवादी हल्ला होता. स्फोटांचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. संशयितांचा शोध घेण्यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. हे स्फोट 2000 च्या दशकातील पॅलेस्टिनी उठावादरम्यान इस्रायलमध्ये झालेल्या विनाशकारी बस बॉम्बस्फोटांची आठवण करून देणारे होते. तथापि, असे हल्ले आता दुर्मिळ झाले आहेत.
तेल अवीवच्या बाहेरील दोन इस्रायली उपनगरांमध्ये तीन बसेस बॉम्बने उडवण्यात आल्या. तसेच अन्य चार बसमध्ये स्फोटक उपकरणे सापडली. काही इस्रायली माध्यमांनी प्रसारित केलेल्या टेलिव्हिजन फुटेजमध्ये एक पूर्णपणे जळालेली बस दाखवण्यात आली असून दुसरी आगीत जळत असल्याचे दिसत आहे. स्फोटानंतर पंतप्रधान नेतन्याहू यांनी संरक्षणमंत्री, लष्करप्रमुखांसह पोलीस आयुक्तांची भेट घेतली. बॅट याममधील विविध ठिकाणी बसेसमध्ये झालेल्या स्फोटांची चौकशी सुरू असल्याचे पोलिसांनी एका निवेदनात म्हटले आहे.
बसेसमध्ये झालेल्या स्फोटांनंतर इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी शुक्रवारी लष्कराला वेस्ट बँकमध्ये कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले. तसेच नेतन्याहू यांच्या कार्यालयाने हा सामूहिक हल्ल्याचा प्रयत्न असल्याचे म्हटले आहे. पार्क करण्यात आलेल्या बसेसमध्ये स्फोट घडवण्यात आले असून या घटनेवेळी बस रिकाम्या होत्या. पोलिसांच्या बॉम्ब निकामी करणाऱ्या पथकांकडून संशयास्पद वस्तूंचा शोध घेतला जात असल्याचे पोलिसांनी निवेदनात म्हटले आहे.
बॅट यामच्या महापौर त्झविका ब्रोट यांनीही एक व्हिडिओ स्टेटमेंट जारी केले आहे. दोन वेगवेगळ्या पार्किंग लॉटमध्ये दोन बसेसमध्ये स्फोट झाल्याचे त्यांनी सांगितले. या घटनांमध्ये कोणीही जखमी झाले नाही, असे त्यांनी सांगितले.
इस्रायली सैन्य गेल्या महिन्याभरापासून वेस्ट बँकमध्ये मोठ्या प्रमाणात लष्करी कारवाई करत असून ते दहशतवाद्यांना लक्ष्य करत आहे. वेस्ट बँक भागात निर्वासित छावण्यांमधील हजारो पॅलेस्टिनींना त्यांची घरे सोडण्यास भाग पाडण्यात आले आहे. तसेच घरे आणि पायाभूत सुविधा उद्ध्वस्त करण्यात आल्या आहेत.