कुमठा येथील डेपोमधील बस जळून खाक
रविवारी रात्री घटना : शॉर्टसर्किटने आगीचा संशय
कारवार : जिल्ह्यातील कुमठा येथील कर्नाटक राज्य परिवहन महामंडळाच्या डेपोमध्ये थांबविण्यात आलेली बस रविवारी रात्री जळून खाक झाल्याची घटना घडली आहे. जळालेल्या बसच्या आजुबाजुला अन्य बसेस नसल्यामुळे मोठी दुर्घटना टळली आहे. शिवाय ही बस रस्त्यावर धावत असताना घटना घडली असती तर मोठी दुर्घटना घडली असती. या दुर्घटनेबद्दल समजलेली अधिक माहिती अशी की, रविवारी पणजीवरून परतलेली बस कुमठा बस डेपोमध्ये थांबविली होती. रविवारी रात्री सुमारे दोन वाजता बसने पेट घेतला. घटनेची माहिती मिळताच बसचालक व वाहक अन्य कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल होवून आग विझविण्यात आली. तत्पूर्वीच बसच्या दर्शनी भागाची मोठी हानी झाली. शॉर्टसर्किटमुळे बसने पेट घेतला असावा, असा संशय व्यक्त करण्यात येत आहे. कुमठा पोलीस अधिक तपास करीत आहेत.