आसाममध्ये बस अन् ट्रकची टक्कर, 14 ठार
वृत्तसंस्था/ गोलाघाट
आसामच्या डेरगाव येथे बुधवारी सकाळी भीषण रस्ते दुर्घटना घडली आहे. एक बस आणि ट्रक यांची जोरदार टक्कर झाली असून यात 14 जणांचा मृत्यू झाला तर 27 जण गंभीर जखमी झाले आहेत. दुर्घटनेची माहिती मिळताच पोलिसांचे पथक तेथे तातडीने पोहोचले. दुर्घटनाग्रस्त बसमध्ये अडकुन पडलेल्या प्रवाशांना स्थानिक लोकांच्या मदतीने बाहेर काढत रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यातील अनेकांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे.
आसामच्या गोलाघाट जिल्ह्यातील डेरगावनजीक बुधवारी सकाळी ही दुर्घटना झाली आहे. बसमधून प्रवास करणारे 45 जण पिकनिकसाठी तिनसुकियाच्या तिलिंगा मंदिराच्या ठिकाणी जात होते. दोन्ही वाहनांचा वेग अधिक असल्याने बसमधील 14 प्रवाशांचा दुर्घटनास्थळीच मृत्यू झाला आहे.
ट्रकमधून कोळशाची वाहतूक केली जात होती. ट्रकचालकाने चुकीच्या दिशेने ट्रक चालविल्याने ही दुर्घटना घडल्याची चर्चा आहे. डेरगाव नजीक झालेल्या या दुर्घटनेसंबंधी पोलीस तपास करत आहेत. दुर्घटनेसमयी दाट धुके पसरले होते असे पोलिसांकडून सांगण्यात आले.