राजस्थानच्या सीकरमध्ये बस दुर्घटना, 12 ठार
उड्डाणपुलाला धडकली बस : अनेक जण जखमी
वृत्तसंस्था/ सीकर
राजस्थानच्या सीकर जिल्ह्यात मंगळवारी दुपारी एक बस उड्डाणपूलच्या भिंतीला धडकल्याने 12 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 36 हून अधिक प्रवासी जखमी झाले आहेत. सालासर येथून लक्ष्मणगडच्या दिशेने जात असलेली खासगी बस वळण घेत असताना उ•ाणपुलाच्या एका हिस्स्याला जाऊन धडकल्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक भुवन भूषण यादव यांनी सांगितले आहे.
मृतांमध्ये 5 महिलांचा समावेश आहे. तर जखमींना उपचारासाठी लक्ष्मणगड आणि सीकर येथील रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आले आहे. भरधाव वेग असल्याने चालकाला बस पूर्णपणे वळविता आली नाही, यामुळे बस उड्डाणपुलाच्या भिंतीला जाऊन धडकल्याचे प्रत्यक्षदर्शींकडून सांगण्यात आले.
दुर्घटनेत बसचे मोठे नुकसान झाले आहे. तर दुर्घटनेनंतर बसमधील प्रवाशांच्या मदतीसाठी परिसरातील लोकांनी धाव घेतली. सर्व जखमींना नजीकच्या रुग्णालयात हलविण्यात आले. जिल्हाधिकारी मुकुल शर्मा, पोलीस अधीक्षक यादव, शहर पोलीस उपायुक्त शाहीन सी आणि अतिरिक्त जिल्हाधिकारी रतन कुमार यांनी दुर्घटनास्थळी धाव घेतली होती.
दुर्घटनेबद्दल मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांनी दु:ख व्यक्त केले आहे. सीकरच्या लक्ष्मणगड क्षेत्रात बस दुर्घटनेत झालेली जीवितहानी अत्यंत दु:खद आणि हृदयविदारक आहे. मृतांच्या शोकाकुल परिवारांसोबत माझ्या संवेदना आहेत. संबंधित अधिकाऱ्यांना जखमी प्रवाशांवर योग्य उपचार सुनिश्चित करण्याचा निर्देश देण्यात आला असल्याचे मुख्यमंत्र्यांनी नमूद केले आहे.