For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

पावसाचा तडाखा

06:30 AM Jul 10, 2024 IST | Tarun Bharat Portal
पावसाचा तडाखा
Advertisement

कोकणासह राज्यभर सुरू झालेले पावसाचे धूमशान, रायगडावरील ढगफुटी, दुथडी भरून वाहणाऱ्या नद्या यामुळे एकूण महाराष्ट्राच्या बऱ्याच भागांतील जनजीवन विस्कळित झाल्याचे दिसून येते. यंदा देशात सरासरीच्या 106 टक्के पावसाचा अंदाज भारतीय हवामान विभागाकडून वर्तविण्यात आला आहे. तथापि, अंदमान-निकोबार बेटे, केरळ व तळकोकणात वेळेआधीच सक्रिय झालेल्या पावसाने नंतरच्या टप्प्यात ओढच दिली. त्यामुळे पेरण्यांसाठी महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या जूनमध्ये उणे पावसाची नोंद झाली. पूर्वापार मृग नक्षत्र हे पावसाकरिता अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. परंतु, यंदा हे नक्षत्र कोरडे गेले. वातावरणातील उष्णतामान कमी करण्यासाठी ओळखल्या जाणाऱ्या जूनमध्ये या वर्षी जाणवलेला कडक उन्हाळा हा तर निसर्गचक्र बदलल्याचेच द्योतक ठरावे. कोपर्निकस क्लायमेट चेंज सर्व्हिसेस या संस्थेने केलेल्या सर्वेक्षणामध्ये यंदाचा जून हा सर्वाधिक उष्ण महिना ठरला असल्यावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. त्यामुळे देशवासियांच्या आशा या प्रामुख्याने जुलैवर होत्या. सध्याचा पाऊस पाहता त्या पल्लवित झाल्या आहेत, असे म्हणावे लागेल. मागच्या दोन ते तीन दिवसांत झालेला पाऊस अफलातूनच म्हणता येईल, कोकण पट्ट्यात झालेला पाऊस काळजात धडकी भरवणाराच ठरावा. सिंधुदुर्गातील सावंतवाडी, कुडाळसह अन्य तालुक्यांमध्ये 200 ते 300 मिमीपर्यंतच्या पावसाची झालेली नोंद, तेरेखोलसह अन्य नद्यांना आलेला पूर याने तेथील जनजीवन विस्कळित झाल्याचे दिसते. रत्नागिरीमध्येही यापेक्षा वेगळी स्थिती नाही. तेथेही 200 मिमीच्या वर पावसाची नोंद झाल्याचे आकडेवारी सांगते. तेथेही अर्जुनासह अन्य नद्या धोक्याच्या रेषेवरून वाहत आहेत. मुंबई आणि संपूर्ण कोकण किनारपट्टीवर सध्या समुद्रही खवळलेल्या अवस्थेत आहे. हे पाहता मच्छिमार व पर्यटकांनी काळजी घेणे क्रमप्राप्त ठरते. कोकण प्रांत हे पर्यटकांचे सर्वांत आवडते ठिकाण. वर्षाचे बारा महिने पर्यटक कोकणात गर्दी करतात. कोकणातील पाऊस अनुभवण्यासाठीही काही पर्यटक आतूर असतात. मात्र, सध्याचा पावसाचा जोर व पूरस्थिती पाहता पर्यटकांनी कोकणची सफर करणे, हे जोखमीचे आहे, हे ध्यानात घ्यायला हवे. किल्ले रायगडवरील ढगफुटी हेच सांगते. छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रायगडावर गडप्रेमी व पर्यटक कायम गर्दी करत असतात. तथापि, रविवारी झालेल्या ढगफुटीने या पर्यटकांच्या काळजाचा ठोका चुकला असणार. काही कळायच्या आत ढगफुटीसारखा भयंकर पाऊस होतो काय, गडाच्या पायरीमार्गावर प्रचंड वेगात धबधब्यासारखे पाणी वाहते काय आणि पर्यटक त्यात अडकून पडतात काय, हे सगळेच अतर्क्य आणि धोक्याची जाणीव करून देणारे म्हणता येईल. महादरवाजा, पायरी मार्ग व इतर ठिकाणी काही क्षणातच आलेल्या पाण्याच्या लोंढ्याचे व्हिडिओ सर्वत्र व्हायरल झाले आहेत. या पाण्याचा वेग पाहता अनेक जण त्यातून वाहून जाण्याची भीती होती. सुदैवाने रायगडावरील तटबंदीच्या व परस्परांच्या आधाराने पर्यटकांना जीवदान मिळाले. मात्र, यातून योग्य तो बोध घेणे आवश्यक ठरते. जुलै हा पावसापाण्याच्या दृष्टीने जोखमीचा महिना मानला जातो. या महिन्यातल्या आषाढातला पावसाचा स्वभाव हा बव्हंशी रौद्र. त्यामुळे या काळात सह्याद्रीच्या डोंगरकपाऱ्यात जाणे टाळलेलेच बरे. तसा श्रावणातला पाऊस हा रिमझिमणारा, हलका, फुलका. त्यामुळे हा काळ फिरण्यासाठी सर्वोत्तम मानण्यात येतो. असे असले, तरी मोठ मोठे धबधबे, नागमोड्या, निसरड्या वाटा यांच्यापासून दूर राहणेच उत्तम. पुण्यातील धबधबा पर्यटनाची हौस संपूर्ण कुटुंबाच्या जीवावर कशी बेतली, ताम्हिणीतील धबधब्याच्या कुंडात उतरण्याचे दु:साहस तऊणाच्या कसे अंगलट आले, याचा आँखो देखा हाल आपण सर्वांनी व्हिडिओमध्ये पाहिला आहे. या घटनांच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने अनेक निर्बंध लादले खरे. मात्र, तरीही वाटा, चोरवाटांच्या मार्गाने पर्यटक धबधब्यांपर्यंत पोहोचत असतील, तर हा बेधुंदपणा व बेबंदपणाचा कळसच म्हटला पाहिजे. धबधब्याचा प्रवाह वा गडकिल्ल्यांवर पर्यटक अडकून पडल्याची प्रकरणे नवीन नाहीत. यंदाही मुख्य दुर्घटनांशिवाय अशी शेकडो प्रकरणे समोर आली आहेत. त्यामुळे भविष्यात अशा अतिउत्साही पर्यटकांना रोखणे, हे प्रशासनापुढचे मोठे आव्हान असेल. त्यामुळे याबाबत जनजगारण कसे करता येईल तसेच निर्बंध अधिकाधिक कसे कडक करता येतील, यादृष्टीने पावले उचलायला हवीत. पुढच्या काही दिवसांत पावसाचे सत्र कायम राहणार असून, अनेक जिल्ह्dयांना अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे हौशी पर्यटकांनी विशेष दक्षता घ्यायला हवी. ढगफुटीसदृश पावसाने काय होते, हे मागच्या काही दिवसांत पुणे, पिंपरीसारख्या शहरांनी अनुभवले आहे. शंभर मिमी पावसाने शहरातील रस्त्यांना नद्यांचे स्वऊप येत असेल, तर त्यातून दुर्घटना घडण्याची शक्यताही निर्माण होते. म्हणूनच अशा पावसात घराबाहेर पडणे टाळायला हवे. अतिवृष्टीचा धोका लक्षात घेऊन पुण्यामुंबईसह राज्याच्या अनेक भागांतील शाळांना सोमवारी मंगळवारी सुटी जाहीर करण्यात आली होती. मात्र, अनेक भागांत कडक ऊन पडल्याने हवामान विभागाच्या अंदाजावर टीका झाली. असे असले, तरी मुलांबाबत अधिकची दक्षता घेणे, हे प्रशासन, पालकांसह सर्वांचे कर्तव्य ठरते. मागच्या वर्षी पावसाने ताण दिला. परिणामी यंदाचा उन्हाळा कडक गेला. जूनमध्ये अपेक्षित पाऊस न झाल्याने पाण्याचा प्रश्न अद्याप मिटलेला नाही. पेरण्याही 71 टक्के क्षेत्रावरच झाल्या आहेत. त्यामुळे राज्यातील धरणांना व शेतीमातीला पावसाची प्रतीक्षा असेल. हे पाहता जुलैच्या पावसावर बऱ्याच गोष्टी अवलंबून असतील.

Advertisement

Advertisement

Advertisement
Tags :

.