दफन : राजकीय मतभेदांचे अन् अनोळखी मृतदेहांचे!
कर्नाटकात काँग्रेस पाठोपाठ भाजपमधील संघर्षही सुरूच आहे. प्रदेशाध्यक्ष बी. वाय. विजयेंद्र यांना बदलण्यासाठी पक्षांतर्गत असंतुष्टांचे प्रयत्न सुरूच आहेत. ठरल्याप्रमाणे प्रदेशाध्यक्ष पदावर नवी निवड व्हायला हवी होती. पक्षाने पुन्हा महिनाभरासाठी ही निवड लांबणीवर टाकल्याची माहिती मिळाली आहे. संसदेच्या अधिवेशनानंतर निवड प्रक्रियेला चालना मिळण्याची शक्यता आहे. माजी केंद्रीयमंत्री बसनगौडा पाटील-यत्नाळ यांनी तर दोन महिन्यात भाजपचे हायकमांड आपल्याला पक्षात घेणार आहेत, असे जाहीर केले आहे. बसनगौडा यांची हकालपट्टी केल्यानंतर पक्षातील सुंदोपसुंदी दूर करण्यासाठी येडियुराप्पा व विजयेंद्र यांच्याकडून प्रयत्न करण्यात आले. या प्रयत्नांचाच एक भाग म्हणून माजी मंत्री जनार्दन रे•ाr व बी. श्रीरामुलू यांच्यात दिलजमाई करण्यात आली आहे. काही महिन्यांपूर्वी या दोन्ही नेत्यांनी एकमेकांसमोर श•t ठोकले होते. विजयेंद्र यांच्या पुढाकारातून हे जुने मित्र आता एकत्र आले आहेत.
आमच्यातील संघर्ष क्षणिक आहे, मैत्री कायम राहणार आहे. आपली मैत्री एका दिवसाची नाही. लहानपणापासूनची आहे. त्यामुळे सर्व मतभेद बाजूला सारून आम्ही दोघे एकत्र आल्याचे या दोन्ही नेत्यांनी विजयेंद्र यांच्या उपस्थितीत गंगावती येथे जाहीर केले आहे. एकीकडे वेगवेगळ्या नेत्यांमधील मतभेद दूर करून त्यांना एकत्र आणण्यासाठी विजयेंद्र यांचे प्रयत्न सुरू आहेत. दुसरीकडे भाजपमधील बंडखोरांनी मात्र आपली भूमिका कायम ठेवली आहे. कोणत्याही परिस्थितीत विजयेंद्र यांचे नेतृत्व आम्ही मान्य करणार नाही, असे सांगत असंतुष्टांनी बैठकांचे सत्र सुरूच ठेवले आहे.
बी. वाय. विजयेंद्र समर्थक नेत्यांच्या मते प्रदेशाध्यक्षपदाची धुरा त्यांच्याच खांद्यावर येणार, अशी अटकळ आहे. असंतुष्टांना मात्र हायकमांड आपले म्हणणे ऐकून प्रदेशाध्यक्ष बदलणार, असे वाटते. भाजपप्रमाणेच काँग्रेसमध्येही सत्तासंघर्ष संपुष्टात येण्याची लक्षणे दिसत नाहीत. मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी म्हैसूरमध्ये सरकारची साधना सांगण्यासाठी मेळावा भरवला होता. या मेळाव्यातून उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार हे अर्ध्यावर उठून गेले होते. त्यानंतर भाषण करताना मुख्यमंत्र्यांनी डी. के. शिवकुमार यांचा नामोल्लेख टाळला होता. जे व्यासपीठावर आहेत, त्यांची नावे घ्यायला हवी. जे घरी बसले आहेत, त्यांची नावे घ्यायची गरज नाही, असे सिद्धरामय्या यांनी सांगितले होते.
या मेळाव्यात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्षही असणारे उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांचा अपमान झाल्याचे समर्थकांचे म्हणणे आहे. सिद्धरामय्या यांनी मात्र शिवकुमार यांचा आपण अपमान केला नाही. ते अर्ध्यावर उठून गेले म्हणून आपल्या भाषणात त्यांचा उल्लेख केला नाही. त्यामुळे त्यांचा अपमान करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, असे सांगितले आहे. दिल्लीहून आल्यानंतर डी. के. शिवकुमार यांनी मात्र सावध पवित्रा घेणेच पसंत केले आहे.
कर्नाटकात आणखी एक धक्कादायक घडामोड घडली आहे. केवळ कर्नाटकच नव्हे तर देशभरातील कोट्यावधी भाविकांचे श्रद्धास्थान असलेले श्री क्षेत्र धर्मस्थळ ठळक चर्चेत आले आहे. काही वर्षांपूर्वी झालेले सौजन्या खून प्रकरण, त्या प्रकरणाची चौकशी, सौजन्याला न्याय मिळावा म्हणून सुरू झालेले आंदोलन आदींमुळे अधूनमधून चर्चा सुरूच होती.
आता अचानक एका अज्ञात व्यक्तीने न्यायालयात हजर होऊन गेल्या वीस वर्षांत धर्मस्थळ परिसरात शेकडो खून झाले आहेत. यामध्ये अल्पवयीन मुली, तरुणींचीच संख्या अधिक आहे. आपणच परिसरातील जंगलात त्यांचे मृतदेह दफन केले आहेत. या गोष्टी करताना आपल्याला काही वाटले नाही. आता पश्चाताप होतो आहे. त्यामुळे कोठे कोठे मृतदेह पुरून ठेवले आहेत, हे आपण दाखवणार आहे, अशी जबानी दिली आहे. सर्वोच्च न्यायालयापासून बेळतंगडी येथील न्यायालयापर्यंत यासंबंधीच्या प्रक्रिया सुरू झाल्या आहेत. त्यामुळे केवळ कर्नाटकातीलच नव्हे तर राष्ट्रीय प्रसारमाध्यमांमध्येही ‘धर्मस्थळ फाईल्स’ या नावाने ठळक चर्चा सुरू झाली आहे.
राज्य सरकारने या प्रकरणाच्या चौकशीसाठी डॉ. प्रणव मोहंती, एम. एन. अनुचेत, सौम्यलता, जितेंद्रकुमार दयाम आदी आयपीएस अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली एसआयटीची स्थापना केली आहे. अज्ञात व्यक्तीने केलेला दावा खरा आहे की खोटा? याची चौकशी करून एसआयटीला अहवाल द्यायचा आहे. या मुद्द्यावरून राजकीय संघर्षही सुरू झाला आहे. प्रसिद्ध धर्मस्थळाच्या नावाला बट्टा लावण्यासाठी टूलकिटचा वापर सुरू झाल्याचा आरोप भाजप नेत्यांनी केला आहे. धर्मस्थळ मंजुनाथेश्वर हे हिंदूंचे जागृत ठिकाण आहे. त्याची बदनामी करण्यासाठी अन्य धर्मियांकडून सुरू असलेल्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून हा आरोप झाल्याचे अनेकांचे म्हणणे आहे.
सौजन्या खून प्रकरणाची नव्याने चौकशी व्हावी, या मागणीसाठी गेल्या अनेक वर्षांपासून व्यवस्थेविरुद्ध झुंज देणाऱ्या नेत्यांच्या मते धर्मस्थळ परिसरात घडलेल्या खुनांची चौकशी तर होऊ द्या, स्वत:ची ओळख लपवून ठेवून ज्या व्यक्तीने शेकडो मृतदेह पुरल्याचा दावा केला आहे, त्याची खातरजमा तर करून घ्या, त्याने केलेला दावा खोटा ठरला तर खुशाल त्याला शिक्षा द्या. खरोखरच जंगल परिसरात कबरी आढळल्या तर त्या कोणाच्या? त्यांचा मृत्यू कसा झाला? त्यांचे मारेकरी कोण? याची चौकशी करावी लागणार आहे. गेल्या वीस वर्षांपासून अनेक महिला, तरुणी गूढरीत्या बेपत्ता झाल्या आहेत. त्यांचा थांगपत्ता लागला नाही. या सर्व प्रकरणांचा तपास करावा लागणार आहे. धर्मस्थळ परिसरातील जंगलातील कबरींखाली दडलंय तरी काय? याचा उलगडा झाल्यानंतर बरीच धक्कादायक माहिती उघडकीस येणार आहे.