For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

नावगे येथे भरदिवसा घरफोडी

12:22 PM Sep 18, 2025 IST | Tarun Bharat Portal
नावगे येथे भरदिवसा घरफोडी
Advertisement

चोरट्यांकडून धाडसी चोरी : सोने-चांदीसह रोख रक्कम लंपास

Advertisement

वार्ताहर/किणये 

नावगे येथे रस्त्याच्या बाजूला शिवारात असलेले घर चोरट्यांनी भरदिवसा फोडले आहे.  चोरट्यांनी घरातील सोने, चांदी व रोख रक्कम लंपास केली आहे. रामलिंग मष्णू कर्लेकर यांच्या घरात बुधवारी चोरी झाली असून सायंकाळी साडेपाचच्या दरम्यान हा प्रकार उघडकीस आला. याबाबत सचिन रामलिंग कर्लेकर व स्थानिक नागरिकांकडून मिळालेली अधिक माहिती अशी, रामलिंग कर्लेकर यांचे घर नावगे गावाकडे जाणाऱ्या रस्त्याच्या बाजूलाच शिवाराजवळ आहे. रामलिंग व त्यांची पत्नी दोघेही बुधवारी सकाळी शेताकडे गेले होते. तसेच त्यांचा मुलगा सचिन व त्यांची पत्नी दुपारी बाराच्या दरम्यान दवाखान्याला गेले होते.

Advertisement

दिवसभर घरात कोणीही नव्हते. घराला कुलूप लावण्यात आला होता. सायंकाळी साडेपाचच्या दरम्यान सचिन घरी आले असता घराचा समोरील दरवाजा उघडलेला व कपाटे व दरवाजे फोडलेले त्यांच्या निदर्शनास आले. त्यांनी लागलीच याबाबतची माहिती गावातील पंचांना दिली. ग्राम पंचायत सदस्य व गावातील पंचमंडळींनी याबाबतची माहिती वडगाव ग्रामीण पोलिसांना दिली. घरच्या मुख्य दरवाजाची चावी आपण समोरच्या मीटर बॉक्स वरती ठेवलेली होती आणि आतील सर्व दरवाजांना कुलूप लावलेला होता, असे सचिन यांनी सांगितले. चोरट्यांनी सदर मीटर बॉक्सवर ठेवलेली चावी घेऊन घरचा समोरच्या दरवाजा उघडून आत प्रवेश केला व घरातील अन्य तीन खोल्यांचे दरवाजे फोडून घरात प्रवेश केला.

स्वयंपाक खोलीतील एक व देवघर खोलीतील दोन कपाटे चोरट्यांनी फोडली. यातील सुमारे आठ तोळे सोने व दहा तोळे चांदी तसेच दोन लाख 50 हजार रुपये रोख रक्कम चोरट्यांनी लांबविली असल्याची माहिती सचिन कर्लेकर यांनी दिली आहे. घटनास्थळी वडगाव ग्रामीणचे एसीपी गंगाधर, सीपीआय नागनगौड कट्टीमनीगौडर व त्यांच्या सहकाऱ्यांनी येऊन पाहणी केली. याचबरोबर श्वान पथकही आणण्यात आले होते. श्वान घरातील समोरच्या दरवाज्यातून घरच्या सर्व खोल्यांमध्ये गेले व घरच्या पाठीमागे जाऊन घुटमळले. तसेच ठसे तज्ञ आले होते. त्यांनीही तपास सुरू केला आहे.

नागरिकांमध्ये भीती

सध्या शेती-शिवारांमध्ये भात भांगलन व इतर कामे जोमाने सुरू आहेत. यामुळे गावातील नागरिकांना आपापल्या शिवारात जावेच लागते. मात्र घरात कोणीही नसताना पाहून चोरट्यांनी नावगे गावात धाडसी  चोरी केली आहे. यामुळे गावातील नागरिक भयभीत झाले आहेत. रात्री उशिरा कर्लेकर हे वडगाव पोलीस स्थानकात तक्रार नोंद करण्यासाठी गेले होते. रात्री उशिरापर्यंत पोलिसांकडून नेमके किती तोळे सोने व चांदी चोरीस गेले आहेत. याबाबतची माहिती उपलब्ध झाली नाही. मात्र वडगाव ग्रामीण पोलीस पुढील तपास करत आहेत.

Advertisement
Tags :

.