कंग्राळी बुद्रुक येथे भरदिवसा घरफोडी
तीन तोळे सोन्याच्या दागिन्यांसह दोन लाखाचा ऐवज लांबविला
वार्ताहर /कंग्राळी बुद्रुक
कंग्राळी बुद्रुक येथील संताजी गल्लीमधील बंद घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी तीन तोळे सोन्याच्या दागिन्यासह रोख रक्कम मिळून दोन लाख 15 हजार रुपये ऐवजाची चोरी केली. बुधवारी भरदिवसा दुपारी 12.30 वा. ही चोरीची घटना घडल्यामुळे नागरिकांतून भीतीचे वातावरण पसरले आहे. तसेच चोरट्यांपासून आपली घरे सुरक्षित राहणार की नाही अशी भीतीही व्यक्त होत आहे. संताजी गल्ली परिसरातील तानाजी औंधकर यांच्या घरी ही चोरी झाली असून चोरट्यांनी दिवसाढवळ्याही चोरी करून पोलीस खात्यासमोर आव्हानच उभे केल्याचे दिसून येत आहे. बुधवारी सकाळी तानाजी औंधकर हे आपली आई आजारी असल्यामुळे दवाखान्याला आईला घेऊन गेले होते. तर पत्नी आपल्या दुकानमध्ये गेल्या होत्या. हीच संधी साधून चोरट्यांनी घराच्या समोरील दरवाजाचा कुलूप तोडून आत प्रवेश केला. तिजोरी फोडून चोरट्यांनी तिजोरीतील तीन तोळे सोन्याचे दागिने व रोख 6000 रुपये रक्कम लांबविली. तानाजी हे दवाखान्याहून घरी आल्यानंतर घराचा समोरील दरवाजा उघडा असल्याचे निदर्शनास आले. तेव्हा घरात घुसून पहातात तर तिजोरी फोडून साहित्य अस्ताव्यस्त पडलेले दिसले. यावेळी काकती पोलीस स्थानकाचे पोलीस अधिकारी व त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनेचा पंचनामा केला. यावेळी ग्रा. पं. सदस्य जयराम पाटील उपस्थित होते. पोलीस चोरीचा पुढील तपास करीत आहेत.