कुत्र्यांना बिस्कीटे घालून घरफोडी
कोल्हापूर :
बंद घरातील कुत्र्यांना बिस्कीटे खायला घालून अज्ञात चोरट्यांनी प्राध्यापिकेच्या बंद बंगल्यातील सहा तोळ्यांची दागिने लंपास केले. कदमवाडी येथील विजयनगर हौसिंग सोसायटीमध्ये शुक्रवारी (दि. 21) सकाळी नऊ ते रात्री अकराच्या दरम्यान हा प्रकार घडला. याबाबत जानकी तानाजीराव सुर्वे (वय 41, सध्या रा. कदमवाडी, मूळ रा. पाडळी, ता. तासगाव, जि. सांगली) यांनी शाहूपुरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.
चोरट्यांनी दोन तोळ्यांचे मंगळसूत्र, एक तोळ्याची सोनसाखळी, दोन तोळ्यांच्या दोन अंगठ्या, अर्ध्या तोळ्याची कर्णफुले आणि अर्धा तोळ्यांचे इतर दागिने असा सुमारे चार लाखांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केल्याचा उल्लेख सुर्वे यांनी फिर्यादीत केला आहे.
फिर्यादी जानकी सुर्वे या मुळच्या तासगांव येथील असून कदमवाडीतील नर्सिंग कॉलेजमध्ये त्या प्राध्यापिका आहेत. विजयनगर हौसिंग सोसायटीत भाउसाहेब ढणाल यांच्या राजागंगा बंगल्यात त्या एकट्याच भाड्याने राहतात. त्यांच्याकडे दोन कुत्री आहेत. ही कुत्री नेहमी त्यांच्या घरामध्येच असतात. शुक्रवारी सकाळी 9 वाजता त्या नेहमीप्रमाणे घर बंद करून कॉलेजवर गेल्या. त्यावेळी त्यांची दोन्ही कुत्री बंगल्याच्या हॉलमध्ये होती. रात्री अकराच्या सुमारास परत आल्यानंतर त्यांना घराच्या दरवाजाचे कुलूप काढलेले दिसले. आत जाऊन पाहिले असता कुत्र्यांसमोर काही बिस्किटे पडली होती. वरच्या मजल्यावरील बेडरूममध्ये साहित्य विस्कटले होते. बेडचे कुलूप तोडून चोरट्याने सहा तोळे दागिन्यांची चोरी केल्याचे निदर्शनास आले. त्यांनी या घटनेची माहिती शाहूपुरी पोलिसांना दिली. शाहूपुरी पोलिसांनी घटनेचा पंचनामा करून चोरट्यांचा माग काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, यात यश आले नाही. चोरट्यांनी कुत्र्यांसमोर बिस्किटे टाकून त्यांना खाण्यात व्यस्त ठेवून चोरट्यांनी चोरी केल्याची माहिती तपासात समोर आली आहे. पोलिसांनी परिसरातील सिसीटीव्ही फुटेज ताब्यात घेवून शोध घेण्याचे काम सुरु केले.