बर्गर खाण्याचा विश्वविक्रम
आतापर्यंत 34000 बर्गर फस्त
एका इसमाने सर्वाधिक बर्गर खाण्याचा विक्रम स्वत:च्या नावावर केला आहे. या इसमाचे नाव डोनाल्ड गोर्स्के असून त्याने 2023 मध्ये 728 अतिरिक्त बर्गर खाल्ले आहेत. 70 वर्षीय डोनाल्ड यांच्या नावावरच हा विक्रम आधी देखील होता. आता त्यांच्या बिग मॅक बर्गर खाण्याचा आकडा 34,128 झाला आहे. बर्गर खाण्याच्या या स्वत:च्या प्रवासाला डोनाल्ड यांनी सुमारे 52 वर्षांपूर्वी सुरू केले होते. गिनिज वर्ल्ड रेकॉर्ड्सनुसार ही तारीख 17 मे 1972 अशी होती.
मी बहुधा जीवनभर बर्गर खात राहणार असल्याचे उद्गार डोनाल्ड यांनी काढले आहेत. अमेरिकेच्या विस्कॉन्सिन येथे राहणारे डोनाल्ड हे एक निवृत्त तुरुंगाधिकारी आहेत. त्यांनी दशकांपासून स्वत:च्या बर्गरचे कंटेनर आणि त्याची पावती जपून ठेवली आहे. त्यांनी याप्रकरणी पहिला विश्वविक्रम 1999 मध्ये नेंदविला होता. प्रारंभी ते प्रतिदिन 9 बर्गर खायचे. नंतर ही संख्या त्यांनी 2 वर आणली. ते दुपारी लंचमध्ये एक तर दुसरा बर्गर रात्रीच्या डिनरवेळी खायचे.
डोनाल्ड गोर्स्के हे ताजा बर्गर खरेदी करण्यासाठी दररोज मॅकडोनाल्ड्समध्ये जायचे. परंतु निवृत्त झाल्यावर ते आठवड्यात दोनवेळा अनेक बर्गर घेऊन येतात. एक बर्गर त्वरित खातात तर उर्वरित बर्गर घरात ठेवतात. भूक लागल्यावर ते बटाट्याचे चिप्स, फ्रूट बार आणि आइस्क्रीम देखील खातात. त्यांनी 1984 मध्ये बर्गर किंग व्हॉपरला ट्राय केले होते. परंतु स्वत:च्या पसंतीच्या बिग मॅकशी देखील ते जोडलेले राहिले. जेव्हा मला एखादी गोष्ट आवडते, तेव्हा मी कायम त्याच्याशी जोडलेला राहतो. बर्गर खाण्यामुळे मला कधीच आरोग्याच्या समस्येला सामोरे जावे लागले नाही, असे त्यांनी म्हटले आहे. परंतु काही काळापूर्वी त्यांनी फ्रेंच फ्राइज खाणे बंद केले आहे. याचबरोबर ते दररोज 6 मैल चालत असतात.