For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

बेळवट्टी भागात बससेवेचा बोजवारा

10:23 AM Dec 27, 2023 IST | Tarun Bharat Portal
बेळवट्टी भागात बससेवेचा बोजवारा
Advertisement

विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान : परिवहन खात्याच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष :  पालकवर्गातून तीव्र संताप

Advertisement

वार्ताहर /किणये

बेळवट्टी भागात अपुऱ्या व अनियमित बससेवेमुळे प्रवासी व विद्यार्थीवर्गाचे हाल होऊ लागले आहेत. बसथांब्यावर तासन्तास बसची वाट पाहत ताटकळत बसावे लागत आहे. यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान अधिक प्रमाणात होत असल्याच्या तक्रारी पालकवर्गातून होत आहेत. आपल्या ग्रामीण भागात या बससेवेचा बोजवारा उडाला आहे, अशी माहिती स्थानिक नागरिकांनी दिली आहे. बेळवट्टी, इनाम बडस, धनगरवाडा, बिजगर्णी, गोल्याळी, बाकनूर परिसरात सध्या बस वेळेवर येत नाहीत, अशा तक्रारी प्रवासी वर्गातून होत आहेत. त्या बससेवेचा सर्वाधिक फटका विद्यार्थी वर्गाला बसला आहे. त्यामुळे त्यांना शाळा कॉलेजलाही ये-जा करणे अवघड बनले आहे.

Advertisement

बेळवट्टी भागातून बरेचसे विद्यार्थी बेळगावला शाळा, हायस्कूल व कॉलेजला रोज येतात. मात्र त्यांना गावातून शाळा कॉलेजला येण्यासाठी वेळेत बस उपलब्ध होत नाही. यामुळे शाळा, कॉलेजला उशिरा जावे लागत आहे. परिणामी उशिरा गेल्यामुळे त्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. सायंकाळी घरी येताना पुन्हा वेळेत बस नसल्यामुळे या विद्यार्थ्यांना रात्रीच घरी यावे लागत आहेत. तर काही पालक वर्गांना बेळगावला शाळेसाठी गेलेल्या आपल्या मुलींना आणण्यासाठी दुचाकी घेऊन जावे लागत आहे. अपुऱ्या व अनियमित बससेवेमुळे विद्यार्थी आणि त्यांचे पालकवर्ग अक्षरश: वैतागून गेलेले आहेत. गोल्याळी-बाकनूर या भागातून बेळवट्टी हायस्कूलला काही विद्यार्थी बसने येतात. मात्र त्यांना बस वेळेवर मिळत नाही. त्यामुळे त्यांना बऱ्याचवेळा पायपीट करावी लागते आणि सायंकाळी घरी जातानाही त्रास सहन करावा लागतो.

बसेस वेळेवर नसल्याने हाल

गोल्याळी व बोकनूर या बसेस बेळवट्टी गावावरून जातात. मात्र या बसफेऱ्या येतात कधी आणि जातात कधी याचे योग्यप्रकारे वेळापत्रक इथल्या नागरिकांना व विद्यार्थ्यांना माहीत नाही. कारण बस वेळेवर येतच नाही, अशी माहिती स्थानिकांनी दिली आहे. कर्नाटक सरकारने महिलांना बससेवा मोफत केली आहे. यामुळे आधीच बस महिलांनी भरलेल्या असतात. त्यामुळे विद्यार्थ्यांना बसेसच्या पायऱ्यांवर लोंबकळतच प्रवास करावा लागत आहे. राज्य परिवहन मंडळाच्या अधिकाऱ्यांना बेळवट्टी भागातील काही विद्यार्थी व नागरिकांनी अनेकवेळा बससेवा सुरू करण्यात यावी, याबद्दल सांगितले आहे. तरीसुद्धा या भागाकडे सदर अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष झाले आहे. त्यामुळे आता  नागरिक मोर्चा काढण्याच्या तयारीत आहेत.

लोकप्रतिनिधींच्या दुर्लक्षामुळे आंदोलन छेडणार

या भागात बससेवा कमी प्रमाणात आहेत. त्यामुळे जी बस गावाला येते त्या बसमध्ये प्रवाशांची संख्या खूप असते. बसमध्ये महिला व पुऊष आधीच असतात. त्यामुळे विद्यार्थ्यांना बसमध्ये चढणे मुश्किल होते. बेळवट्टी गावातील पाच ते सहा विद्यार्थी बसमध्ये चढताना पडून जखमी झाले. मोठी दुर्घटना घडली तर याला जबाबदार कोण? राज्य परिवहन मंडळ आजचे अधिकारी व लोकप्रतिनिधींचे समस्येकडे दुर्लक्ष झाले आहे. त्यामुळे आता आम्ही आंदोलन छेडणार आहे.

- चेतन पाटील, बेळवट्टी

वेळेवर बस नसल्याने कॉलेजमधील तास चुकतात

बेळगाव येथील कॉलेजला आम्ही सर्व मेडिकलच्या मुली जातो. मात्र गावात सकाळी कॉलेजला जाताना व घरी परत येताना वेळेवर बस नसते. त्यामुळे कॉलेजला जाण्यासाठी उशीर होऊ लागला आहे. त्यामुळे आमचे एक एक वर्ग चुकू लागले आहेत. तसेच घरी येताना सुद्धा बस वेळेवर नसते. त्यामुळे बऱ्याच वेळेला आम्हाला घरच्यांना बोलावून घ्यावे लागते. ग्रामीण भागातील या बससेवेकडे प्रशासनाचे का दुर्लक्ष झाले आहे. आम्हा विद्यार्थ्यांसाठी प्रशासनाने सुरळीत बससेवा करून द्यावी, अशी आमची मागणी आहे.

- आकांक्षा नलवडे, मेडिकल विद्यार्थिनी

Advertisement
Tags :

.