बंद बंगला फोडून 5 लाखाचा ऐवज लंपास
निपाणी आदर्शनगरातील घटना : नागरिकांत भीतीचे वातावरण
प्रतिनिधी/ निपाणी
येथील अष्टविनायक नगर, पंतनगर, बिरोबा माळ, शिवाजीनगर येथे चोरट्यांनी चोरीचा सपाटा लावला आहे. गुरुवारी रात्री 10 च्या सुमारास आदर्शनगर येथे लालमहम्मद नूरमहम्मद मुल्ला यांचा बंगला फोडून सुमारे साडेतीन तोळे सोने व 24 हजारांची रोकड असा एकूण 5 लाखाचा ऐवज लंपास केल्याची घटना उघडकीस आली. गेल्या पंधरा दिवसांपासून चोरटे सक्रीय झाले असून ‘चोरटे पुढे तर पोलीस मागे’ अशी निपाणी शहराची अवस्था झाली आहे. चोरट्यांचा बंदोबस्त पोलीस कधी करणार? असा संतप्त सवाल उपस्थित केला जात आहे.
याबाबत समजलेली अधिक माहिती अशी, लालमहम्मद मुल्ला यांचा राष्ट्रीय महामार्गानजीक आदर्शनगर येथे बंगला आहे. त्यांचे कुटुंबीय पाहुण्यांच्या कार्यक्रमानिमित्त जामदार प्लॉट निपाणी येथे गेले होते. चोरट्यांनी गुरुवारी नेमकी हीच संधी साधून बंगल्याचे कुलूप तोडले. तिजोरीतील साहित्य विस्कटून सुमारे साडेतीन तोळे सोने व 24 हजार रुपयांची रोकड लंपास केली आहे. सदर घटनेची माहिती एका सामाजिक कार्यकर्त्याने दिल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळाला भेट दिली.
लालमहम्मद मुल्ला यांनी निपाणी शहर पोलीस स्थानकात फिर्याद दिली असून पोलीस खासगी सीसीटीव्हीच्या आधारे चोरट्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न करीत आहेत. निपाणी शहरात दिवसेंदिवस चोरीच्या घटना वाढत आहेत. अद्यापही पोलिसांना एकाही चोरट्याला पकडण्यात यश आले नसल्याने चिंता व्यक्त होत आहे.