For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

बंगला लाखात, पण आत...?

06:22 AM Aug 18, 2024 IST | Tarun Bharat Portal
बंगला लाखात  पण आत
Advertisement

महानगरांमध्येच नव्हे, तर टू टायर आणि थ्री टायर शहरांमध्येही आजकाल घरांची किंमत प्रचंड आहे. इतकी, की सर्वसामान्य माणसाला स्वत:चे घर घेणे दुरापास्त आहे. बेळगाव, कोल्हापूरसारख्या शहरांमध्येही मध्यम आकाराची  सदनिका घेण्यासाठी कोटीत पैका मोजावा लागतो. अशा स्थितीत ब्रिटन या देशाच्या दक्षिण यॉर्कशायर या भागात जर आठ खोल्यांचा प्रशस्त बंगला काही लाख रुपयांमध्ये विक्रीसाठी उपलब्ध असेल, तर त्यावर ग्राहकांच्या उड्या पडतील असे आपल्याला वाटेल. तथापि, या बंगल्याच्या संदर्भात असे घडलेले नाही.

Advertisement

हा बंगला अत्यंत गलिच्छ अवस्थेत आहे. खिडक्या मोडलेल्या, तावदाने फुटलेली. फरशा उखडलेल्या, खोल्यांमध्ये कचऱ्याचे ढीग, दुर्गंधी, भिंतींचा रंग आणि पोपडे उडालेले, छताची अवस्थाही दयनीय, अशा स्थितीत हा बंगला आहे. त्यामुळे हा बंगला भारतीय रुपयांमध्ये अवघ्या चार ते पाच लाखात (तेही ब्रिटसनसारख्या गजबजलेल्या देशात) उपलब्ध असला तरी तो आकर्षणाचे केंद्र बनलेला नाही.

अनेकांना याचे आश्चर्य वाटत आहे. कारण बंगला कितीही अनाकर्षक असला तरी, तो आणखी चार पाच लाख रुपयांमध्ये साफसूफ करुन आकर्षक केला जाऊ शकतो. तरीही त्याकडे लोकांचे फारसे लक्ष गेलेले नाही. या बंगल्याच्या विक्रीची जाहीरात कित्येक दिवसांपासून करण्यात येत आहे. याचे कारण काय असावे, असा प्रश्न अनेकांना पडतो. बंगला, अवतीभोवतीची जागा आदी बाबी खूपच स्वस्तात उपलब्ध असल्या तरीही ज्या भागात हे घर आहे, तो ब्रिटनमधील सर्वाधिक गुन्हेगारीचे प्रमाण असणारा भाग आहे. त्यामुळे सुरक्षेचा प्रश्न महत्वाचा आहे. कारण घर स्वस्तात मिळाले तरी जीवाच्या सुरक्षेची हमी नसेल तर अशा स्थानी राहण्यास कोण तयार होणार ? तज्ञांच्या मते हा बंगला अजूनपर्यंत विकला गेलेला नाही, याचे हेच महत्वाचे कारण असावे. म्हणजे ब्रिटनसारख्या देशातही अशी स्थिती असू शकते, याचे लोकांना अधिक आश्चर्य वाटत आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.