For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

बुमराहचा पंजा अन् राहुलचा थाट

06:58 AM Jun 23, 2025 IST | Tarun Bharat Portal
बुमराहचा पंजा अन् राहुलचा थाट
Advertisement

 शेवटच्या सत्रात टीम इंडियाचा जबरदस्त पलटवार : दुसऱ्या डावात 2 बाद 90 धावा, भारताकडे 96 धावांची आघाडी

Advertisement

वृत्तसंस्था/ लंडन

भारत आणि इंग्लंड यांच्यात सुरू असलेला लीड्स कसोटी सामना रोमांचक मोडवर आहे. सामन्याच्या तिसऱ्या दिवशी इंग्लंडचा पहिला डाव 465 धावांवर आटोपला. पहिल्या डावाच्या आधारे टीम इंडियाला फक्त 6 धावांची आघाडी मिळाली. तिसऱ्या दिवसाचा खेळ थांबला तेव्हा भारताने 2 विकेट गमावून 90 धावा केल्या असून टीम इंडियाची आघाडी 96 धावांवर पोहोचली आहे. केएल राहुल 47 धावा काढून नाबाद आहे, तर कर्णधार शुभमन गिलही 6 धावा काढून खेळत आहे. खराब प्रकाशामुळे खेळ सुमारे 25 मिनिटे आधी संपवावा लागला.

Advertisement

भारताचा पहिला डाव दुसऱ्या दिवशी 471 धावांवर संपुष्टात आला. त्यानंतर इंग्लंडचा संघ पहिल्या डावातील फलंदाजीसाठी उतरला. इंग्लंडकडून जॅक क्रॉली आणि बेन डकेट यांनी डावाची सुरुवात केली. पण बुमराहने पहिल्याच षटकात क्रॉलीला 4 धावांवर करुण नायरच्या हातून झेलबाद केले. पण त्यानंतर बेन डकेटला ऑली पोपची भक्कम साथ मिळली. डकेटने अर्धशतकी खेळी साकारली तर पोपने शतकी खेळी साकारताना 106 धावांचे योगदान दिले. दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला, तेव्हा इंग्लंडने 3 बाद 209 धावा केल्या होत्या. याच धावसंख्येवरुन इंग्लंडने पुढे खेळायला सुरुवात केली.

ब्रुकचे हुकले शतक

शतकवीर पोपला प्रसिध कृष्णाने बाद करत टीम इंडियाला दिवसातील पहिले यश मिळवून दिले. पोपने 137 चेंडूत 14 चौकारांसह 106 धावांची खेळी केली. पोप बाद झाल्यानंतर हॅरी ब्रुक आणि स्टोक्स यांच्यातही पाचव्या विकेटसाठी 51 धावांची भागीदारी झाली. पण स्टोक्सला 20 धावावंर मोहम्मद सिराजने बाद केले. त्यानंतर जॅमी स्मिथ आणि ब्रुक यांचीही जोडी जमली. त्यांच्यातही 73 धावांची भागादीरी झाली. ज्यामुळे इंग्लंडने सहज 350 धावांचा टप्पा पार केला. स्मिथला 40 धावांवर प्रसिद्ध कृष्णाने बाद केले. त्याचा झेल बाऊंड्री लाईनवर रवींद्र जडेजा आणि साई सुदर्शन यांनी मिळून घेतला.

त्यानंतरही ब्रुकने आक्रमक पवित्रा घेतला. ब्रुकचा झेलही तो 82 धावांवर असताना यशस्वी जैस्वालकडून सुटला. पण हे जीवदान फार महागात पडले नाही, कारण त्याला प्रसिद्ध कृष्णाने 88 व्या षटकात शार्दुल ठाकूरच्या हातून 99 धावांवर झेलबाद केले. केवळ 1 धावेने शतक हुकल्याने ब्रुक अत्यंत निराश झाला होता. पण तो बाद झाल्यानंतरही ब्रायडन कार्स आणि ख्रिस वोक्स यांच्यात 8 व्या विकेटसाठी 55 धावांची भागीदारी झाली. त्यामुळे इंग्लंडने 450 धावा पार केल्या. कार्सला सिराजने 22 धावांवर माघारी पाठवले. 99 व्या षटकात वोक्सला बुमराहने 38 धावांवर बाद केले. यानंतर बुमराहनेच 101 व्या षटकात जोश टंगला 11 धावांवर पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. यामुळे इंग्लंडचा पहिला डाव अखेर 100.4 षटकात 465 धावांवर संपला.

टीम इंडियाकडे 96 धावांची आघाडी

दुसऱ्या डावात भारतीय संघाकडून डावाची सुरुवात करण्यासाठी आलेल्या यशस्वी जैस्वालने नाराज केले. तो फक्त 4 धावा करून बाद झाला. त्याचा डाव ब्रायडन कार्सने संपवला. याचवेळी, साई सुदर्शनने 30 धावांची खेळी खेळली. त्यालाही फार मोठी खेळी साकारता आली नाही. दरम्यान, दुसरा दिवसाचा खेळ संपला तेव्हा टीम इंडियाने 23.4 षटकांत 2 गडी गमावत 90 धावा केल्या होत्या. पावसाला सुरुवात झाल्याने खेळ लवकर थांबवण्यात आला. यादरम्यान, केएल राहुल 47 धावांवर नाबाद आहे. गिल त्याच्यासोबत क्रीजवर 6 धावांवर नाबाद आहे. दुसऱ्या डावात राहुलने इंग्लंडविरुद्ध 1000 कसोटी धावा पूर्ण केल्या. राहुल आता इंग्लंड संघाविरुद्ध हा आकडा गाठणारा 17 वा भारतीय फलंदाज बनला आहे. यासोबतच, इंग्लंड हा पहिला देश आहे ज्याविरुद्ध राहुलने कसोटीत 1000 धावा पूर्ण केल्या आहेत. या संघाविरुद्ध त्याची सरासरी 40 च्या आसपास आहे. इंग्लंडनंतर त्याने ऑस्ट्रेलियाविरुद्ध 894 धावा केल्या आहेत.

संक्षिप्त धावफलक

भारत पहिला डाव 471

इंग्लंड पहिला डाव 100.4 षटकांत सर्वबाद 465 (बेन डकेट 62, ओली पोप 106, हॅरी ब्रुक 99, बेन स्टोक्स 20, जेमी स्मिथ 40, ख्रिस वोक्स 38, कार्से 22, बुमराह 83 धावांत 5 बळी, प्रसिध कृष्णा 3 तर मोहम्मद सिराज 2 बळी)

भारत दुसरा डाव 23.5 षटकांत 2 बाद 90 (जैस्वाल 4, साई सुदर्शन 30, केएल राहुल खेळत आहे 47, शुभमन गिल खेळत आहे 6, कार्से व स्टोक्स प्रत्येकी 1 बळी).

जस्सी जैसा कोई नही!

इंग्लंडविरुद्ध पहिल्या कसोटीत जसप्रीत बुमराहने 5 गडी बाद करत इतिहास रचला आहे. त्याने मोठ्या रेकॉर्डमध्ये कपिल देव यांच्या रेकॉर्डची बरोबरी केली आहे. भारताबाहेर कसोटी क्रिकेट खेळताना त्याने सर्वाधिक वेळेस 5 गडी बाद करणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत कपिल देव यांच्या रेकॉर्डची बरोबरी केली आहे. बुमराह आणि कपिल देव यांनी भारताबाहेर गोलंदाजी करताना 12 वेळेस 5 गडी बाद करण्याचा कारनामा केला आहे. कपिल देव यांनी 66 डावात हा कारनामा केला होता. तर बुमराहने हा कारनामा 34 व्या कसोटी सामन्यात करून दाखवला आहे.

ब्रुकचे हुकले शतक

भारतीय संघाला 88.39 च्या स्ट्राईक रेटने गोलंदाजांना धुतलं. त्यामुळे 471 धावा करूनही भारतीय संघाला हवी तशी आघाडी घेता आली नाही. त्याने 112 चेंडूत 11 चौकार आणि 2 षटकार मारत 99 धावा केल्या. पण त्याचे शतक मात्र एका धावेने हुकले. हेडिंग्लेवर 99 धावांवर बाद होणारा हॅरी ब्रूक हा तिसरा फलंदाज ठरला आहे. यापूर्वी 1987 मध्ये सलिम मलिक आणि 1994 मध्ये मायकल एथरटन 99 धावांवर बाद झाला. त्यानंतर आता हॅरी ब्रूक बाद झाला आहे. अशा पद्धतीने या मैदानात बाद होणारा तिसरा फलंदाज ठरला आहे.

आज सकाळच्या सत्रातील खेळ महत्वाचा

भारतीय संघासाठी चौथा दिवस महत्वाचा असेल. कारण भारत या चौथ्या दिवशी इंग्लंडला टार्गेट देऊ शकतो. पण हे टार्गेट देण्यासाठी ती 13 षटकं भारतासाठी महत्वाची ठरणार आहे. जेव्हा तिसऱ्या दिवसाचा खेळ थांबवला तेव्हा पाऊस पडला होता. त्यामुळे खेळपट्टीवर पाणी असेल. दुसरी गोष्ट म्हणजे सकाळी खेळपट्टीवर दव पडू शकते, या दोन्ही गोष्टींचा फायदा इंग्लंडला होणार आहे. कारण खेळपट्टी ओली असली की वेगवान गोलंदाजांना चांगला फायदा होऊ शकतो. त्यामुळे भारताला जर इंग्लंडला 400 पेक्षा जास्त धावांचं टार्गेट द्यायचं असेल तर त्यांना चौथ्या दिवसाचा पहिला तास सावधपणे खेळावा लागेल. एका तासात साधारणपणे 13 षटकं होतात. त्यामुळे भारताने जर या चौथ्या दिवशी पहिली 13 षटकं सावधपणे खेळून काढली, तर त्यांना मोठी धावसंख्या उभारता येऊ शकते.

Advertisement
Tags :

.