बुमराह फक्त तीन कसोटीत खेळणार
गौतम गंभीरची माहिती : आपल्या रणनीतीवर ठाम : दुसऱ्या कसोटीसाठी शार्दुल, प्रसिध कृष्णाला डच्चू मिळण्याची शक्यता
वृत्तसंस्था/ लंडन
भारतीय संघाला पहिल्या कसोटीत यजमान इंग्लंडने 5 गडी राखून पराभूत केले. टीम इंडियाचा अनुभवी गोलंदाज जसप्रीत बुमराहला चौथ्या डावात एकही बळी घेता आला नाही. तसेच, बुमराह या मालिकेत पाच पैकी तीन सामनेच खेळणार आहे असे मालिका सुरु होण्याआधीच सांगण्यात आले होते. अशा परिस्थितीत बुमराह आता कुठले सामने खेळणार, हे अद्याप निश्चित झालेले नाही. दरम्यान, भारताला पहिल्या कसोटीत मानहानिकारक पराभव पत्करावा लागला. त्यानंतर जसप्रीतला सर्व कसोटीत खेळण्याची मागणी होत असताना गंभीरने त्याच्या रणनीतीवर ठाम राहण्याचे ठरवले आहे.
बुमराह लीड्स कसोटीत गोलंदाजी विभागात एकटा खिंड लढवताना दिसला आणि त्याने पहिल्या डावात 5 विकेट्सही घेतल्या होत्या. पण, ऑस्ट्रेलियात जी परिस्थिती होती, तशीच लीड्सवरही दिसली. दुसऱ्या डावात त्याला एकही बळी मिळवता आला नाही. दरम्यान, या मालिकेला रवाना होण्यापूर्वी जसप्रीतवरील कामाच्या भाराच्या व्यवस्थापनावर भर दिला गेला आणि त्यामुळेच या मालिकेत तो तीन कसोटीच खेळेल हे स्पष्ट केले गेले होते. पण, भारताच्या अन्य गोलंदाजांची इंग्लंडमधील कामगिरी पाहता, त्याने पाचही कसोटी खेळावे अशी चर्चा आहे.
अर्थात, गौतम गंभीर मात्र त्याच्या निर्णयावर ठाम आहे. त्याने पहिल्या कसोटीतील पराभवानंतरही हेच स्पष्ट केले की, बुमराह पाचही कसोटी खेळणार नाही. आपण ठरवलेल्या रणनीतीत बदल होणार नाही. बुमराहवरील कामाच्या भाराचे व्यवस्थापन करणे आमच्यासाठी अधिक महत्त्वाचे आहे. पुढे भरपूर क्रिकेट आहे आणि त्याचे तंदुरुस्त असणे संघाच्या हिताचे आहे. इंग्लंडमध्ये येण्यापूर्वी आम्ही त्याला तीन कसोटी खेळवण्याचा निर्णय घेतला होता, त्यामुळे त्यात बदल होणार नाही.
बुमराह दर्जेदार गोलंदाज आहे. अर्थात, त्याची तंदुरुस्ती हा महत्वाचा विषय आहे. तो अन्य कोणत्या दोन कसोटीत खेळेल, हे अद्याप आम्ही ठरवलेले नाही. त्याच्याशिवाय आमच्याकडे चांगले गोलंदाज आहेत. त्यांच्यावर आमचा विश्वास आहे. परिस्थिती पाहून निर्णय घेऊ.
तरुण गोलंदाजांना वेळ देणे महत्वाचे - गंभीर
आपल्याकडील तरुण वेगवान गोलंदाजांना वेळ आणि अनुभव देणे महत्त्वाचे आहे. बुमराह वगळता कोणताही गोलंदाज फारसा प्रभावी दिसला नाही. प्रसिद्ध कृष्णा, सिराज आणि शार्दुल ठाकूर हे लाइन-लेंथमध्ये सातत्याने चांगली कामगिरी करू शकले नाहीत. पूर्वी आमच्याकडे चार वेगवान गोलंदाज होते ज्यांना 40 पेक्षा जास्त कसोटी सामन्यांचा अनुभव होता. कसोटी क्रिकेटमध्ये, विशेषत: परदेशी द्रौयांमध्ये अनुभव खूप महत्त्वाचा असतो, असेही गंभीर यावेळी म्हणाला.
शार्दुल ठाकूर, प्रसिध कृष्णाला डच्चू मिळण्याची शक्यता
टीम इंडियाने पहिल्या कसोटी सामन्यात पाच शतके ठोकली. मात्र असे असूनही पराभवाचे तोंड पहावे लागले. सुमार गोलंदाजी आणि गचाळ क्षेत्ररक्षण यासाठी कारणीभूत ठरले. आता उभय संघातील दुसरा कसोटी सामना 2 जुलैपासून एजबॅस्टन स्टेडियममध्ये होणार आहे. यासाठी टीम इंडियाच्या प्लेइंग 11 मोठी उलथापालथ होण्याची शक्यता आहे. शार्दुल ठाकुरसह प्रसिद्ध कृष्णाला दुसऱ्या कसोटी सामन्यातून डावलले जाण्याची शक्यता आहे. दोन्ही खेळाडूंवर निराशाजनक कामगिरी केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. शार्दुल ठाकुर फलंदाजीतही कामगिरी करेल अशी अपेक्षा होती. मात्र दोन्ही डावात फेल गेला. पहिल्या कसोटी सामन्यात अभिमन्यू ईश्वरन, वॉशिंग्टन सुंदर, अर्शदीप सिंग, ध्रुव जुरेल, नितीश कुमार रे•ाr, आकाश दीप, हर्षित राणा आणि कुलदीप यादव हे खेळाडू बेंचवर बसले होते. आता या खेळाडूंपैकी दोघांना दुसऱ्या कसोटीत संधी मिळण्याची शक्यता आहे.