बुमराहला विश्रांती, राहुलही चौथ्या कसोटीतून बाहेर
वेगवान गोलंदाज मुकेश कुमारचा समावेश
वृत्तसंस्था/ राजकोट
वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहला विश्रांती देण्याच्या दृष्टीने भारतीय कसोटी संघातून मोकळे करण्यात आले आहे, तर फलंदाज के. एल. राहुल शुक्रवारपासून रांची येथे सुरू होणाऱ्या चौथ्या कसोटी सामन्यातून बाहेर पडला आहे. बुमराहला ‘वर्कलोड मॅनेजमेंट’चा भाग म्हणून विश्रांती देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तीन सामन्यांतून 17 बळींसह तो कसोटी मालिकेत गोलंदाजांमध्ये आघाडीवर आहे. विशाखापट्टणम येथील दुसऱ्या कसोटीत प्रभावी मारा करताना त्याने एकहाती भारताला विजय मिळवून दिला होता.
उजव्या मांडीमध्ये दुखत असल्याच्या तक्रारीनंतर राहुल दुसऱ्या आणि तिसऱ्या कसोटीलाही मुकला होता. जसप्रीत बुमराहला इंग्लंडविऊद्ध रांची येथे होणाऱ्या चौथ्या आयडीएफसी फर्स्ट बँक कसोटीसाठीच्या संघातून मुक्त करण्यात आले आहे. मालिकेचा कालावधी आणि अलीकडच्या काळात तो किती क्रिकेट खेळलेला आहे ते लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे, असे बीसीसीआयने एका निवेदनात म्हटले आहे.
के. एल. राहुल चौथ्या कसोटीतून बाहेर पडला आहे. धर्मशाला येथे होणाऱ्या अंतिम कसोटी सामन्यातील त्याचा सहभाग तंदुरुस्तीवर अवलंबून असेल, असे या निवेदनात म्हटले आहे. राजकोटमधील तिसऱ्या कसोटीसाठीच्या संघातून वगळण्यात आलेला वेगवान गोलंदाज मुकेश कुमार रांचीमधील संघात दाखल झाला आहे.
पहिल्या तीन कसोटी सामन्यांमध्ये बुमराहने 80.5 षटके टाकल्याने त्याला विश्रांती देण्याचा निर्णय अपेक्षित होता. वर्कलोड मॅनेजमेंटचा एक भाग म्हणून भारताने मोहम्मद सिराजला विशाखापट्टणममधील दुसऱ्या कसोटीतून विश्रांती दिली होती आणि राजकोटमध्ये झालेल्या तिसऱ्या कसोटीत पुनरागमन करून त्या सामन्यातील भारताच्या पाहुण्यांविऊद्धच्या विक्रमी 434 धावांच्या विजयात त्याने मोलाची भूमिका पार पाडली होती.