‘आयसीसी टेस्ट क्रिकेटर ऑफ दि इयर’ पुरस्कारासाठी बुमराहचे नामांकन
वृत्तसंस्था/ दुबई
भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहचे इंग्लंडचा फलंदाज ज्यो रूटसह सोमवारी आयसीसी वर्षाचा कसोटी क्रिकेटपटू पुरस्कारासाठी नामांकन करण्यात आले आहे. या यादीत इंग्लिश फलंदाज हॅरी ब्रूक व अनुभवी जो रूट आणि श्रीलंकेचा कमिंदू मेंडिस यांचाही समावेश आहे.
बुमराहने यंदा कसोटी क्रिकेटमध्ये 13 सामन्यांत 14.92 च्या सरासरीने 71 बळी मिळविले असून 30.16 च्या स्ट्राइक रेटसह तो सर्वोत्कृष्ट गोलंदाज ठरला आहे. या पारंपरिक स्वरूपात गोलंदाजांच्या दृष्टीने ही सर्वोत्तम आकडेवारी आहे. हा वेगवान गोलंदाज सध्या सुरू असलेल्या बॉर्डर-गावसकर चषक मालिकेत केवळ चार कसोटी सामन्यांमध्ये 30 बळी घेऊन सर्वोत्तम गोलंदाज ठरला आहे.
2023 मध्ये पाठीच्या दुखापतीतून ठीक होऊन कसोटी क्रिकेटमध्ये पुनरागमन केल्यावर बुमराहने यंदा गोलंदाजीत आपले वर्चस्व राखले आणि या कॅलेंडर वर्षात 13 कसोटी सामन्यांत 71 बळी मिळविले. एका वर्षात त्याने मिळविलेले हे सर्वाधिक बळी असून अन्य कोणत्याही गोलंदाजापेक्षा त्याने जास्त बळी मिळविलेले आहेत, असे ‘आयसीसी’ने आपल्या वेबसाइटवर म्हटले आहे.
दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलियामधली वेगवान गोलंदाजीस पोषक परिस्थिती असो किंवा घरच्या मैदानांतील वेगवान गोलंदाजांसाठी कठीण परिस्थिती असो, बुमराह वर्षभर तितकाच प्रभावी राहिला. तथापि, भारताच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यात या वेगवान गोलंदाजाने उत्कृष्ट कामगिरी केलेली आहे, असे आयसीसीने त्यात पुढे म्हटले आहे. आयसीसीने पर्थमधील भारताने 295 धावांनी विजय मिळविलेल्या सामन्यात बुमराहने जे कलाटणी देणारे स्पेल टाकले त्यांना त्याच्या सर्वांत संस्मरणीय कामगिरीपैकी एक मानले आहे.
दुसरीकडे, इंग्लंडचा मुख्य आधार राहिलेला रूट हा वर्षातील सर्वांत प्रभावी फलंदाज राहिलेला असून त्याने 17 कसोटींमध्ये 55.57 च्या सरासरीने 1,556 धावा केल्या आहे. या 34 वर्षीय खेळाडूने आपल्या कारकिर्दीत पाचव्यांदा एका कॅलेंडर वर्षात 1000 धावांचा टप्पा ओलांडलेला असून त्याने यंदा सहा शतके आणि पाच अर्धशतके झळकावली. 2021 मधील रूटच्या 1,708 धावांच्या तुलनेत ही त्याची कसोटीतील दुसऱ्या क्रमांकाची सर्वोत्तम वार्षिक धावसंख्या असल्याचे आयसीसीने नमूद केले आहे. रूटने इंग्लंडसाठी मायदेशी आणि विदेशात सातत्यपूर्ण कामगिरी केली आहे.
रूटचा सहकारी ब्रूकलाही चार शतके आणि तीन अर्धशतकांसह 12 कसोटी सामन्यांतून 1,100 धावा केल्याने निवडलेल्या चार खेळाडूंच्या यादीत स्थान मिळाले आहे. 2024 मध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्यांच्या यादीत ब्रूक हा पहिल्या क्रमांकावरील रूट, भारताचा यशस्वी जैस्वाल (54.74 च्या सरासरीने 1,478 धावा) आणि इंग्लंडचा बेन डकेट (37.06 च्या सरासरीने 1,149 धावा) यांच्या मागे चौथ्या स्थानावर आहे. श्रीलंकेचा मेंडिस, ज्याने नऊ कसोटी सामन्यांमध्ये 74.92 च्या सरासरीने 1,049 धावा केल्या, तो देखील या यादीत आहे. यंदा तो 1000 कसोटी धावा सर्वांत वेगाने काढण्याच्या बाबतीत संयुक्तपणे तिसरा फलंदाज ठरला आहे आणि सर डॉन ब्रॅडमन यांच्या 13 डावांमध्ये हा टप्पा गाठण्याच्या विक्रमाशी त्याने बरोबरी केली आहे.