बुमराहची सर्वोच्च रेटिंग गुणांच्या भारतीय विक्रमाशी बरोबरी
वृत्तसंस्था/ दुबई
भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रित बुमराहने आणखी एक माईलस्टोन गाठला असून आयसीसी कसोटी गोलंदाजांच्या मानांकनात त्याने 904 रेटिंग गुणांच्या विक्रमाशी बरोबरी केली आहे. भारतीय खेळाडूने मिळविलेले हे सर्वाधिक रेटिंग गुण असून याआधी रविचंद्रन अश्विननेही 904 रेटिंग गुण मिळविले होते. आजपासून मेलबर्न कसोटी सुरू होत असून अश्विनला मागे टाकण्याची संधी बुमराहला मिळाली असल्याचे आयसीसीने सांगितले.
कसोटी फलंदाजांच्या मानांकनात ऑस्ट्रेलियाच्या ट्रॅव्हिस हेडने भारताविरुद्धच्या कसोटीत शानदार प्रदर्शन केल्यामुळे त्याने टॉप तीनच्या दिशेने आगेकूच केली आहे. या दोन वैयक्तिक अचीव्हमेंटशिवाय अन्य अनेक लक्षणीय बदल मानांकनात झाले आहेत. बुमराहने कसोटी गोलंदाजांतील अव्वल स्थान आणखी मजबूत केले असून ब्रिस्बेन कसोटीत त्याने 94 धावांत 9 बळी टिपत 14 रेटिंग गुण मिळविले. दक्षिण आफ्रिकेचा कागिसो रबाडा व ऑस्ट्रेलियाचा जोश हॅझलवूड अनुक्रमे दुसऱ्या व तिसऱ्या क्रमांकावर आहेत.
ब्रिस्बेनमध्ये हेडने 152 धावांची शानदार खेळी करीत सलग दुसरे शतक नोंदवल्याने 825 रेटिंग गुणांसह त्याने चौथ्या स्थानावर झेप घेतली तर तिसऱ्या कसोटीत शतकी खेळी करणाऱ्या स्टीव्ह स्मिथलाही टॉप टेनमध्ये पुन्हा स्थान मिळविता आले आहे. भारताच्या केएल राहुलने पहिल्या डावात कडवा प्रतिकार करीत अर्धशतकी खेळी केली, यामुळे त्याने दहा स्थानांची प्रगती करीत 40 व्या स्थानावर मजल मारली आहे. अष्टपैलूंच्या विभागात ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्सने टॉप टेनमध्ये पुन्हा स्थान मिळविले. तिसऱ्या कसोटीत त्याने 4 बळी व 42 धावा केल्या. तसेच हेडचीही अष्टपैलू कामगिरी झाल्याने त्याला या यादीत 9 स्थानांची बढत मिळाली. तो आता 29 व्या स्थानावर आहे.
पुरुषांच्या वनडे फलंदाजांच्या मानांकनात हेन्रिच क्लासेनने पाकविरुद्ध नोंदवलेल्या अर्धशतकांमुळे तो पाचवरून 13 व्या स्थानावर झेपावला आहे. त्याचे 743 रेटिंग गुण झाले आहेत. सईम आयुबच्या दोन शतकांनीही त्याला बढती मिळाली असून 603 गुणांसह 70 व्या स्थानावरून तो एकदम संयुक्त 23 व्या स्थानावर पोहोचला आहे. अष्टपैलूंमध्येही त्याने 113 स्थानांची बढती घेत संयुक्त 42 वे स्थान मिळविले आहे. अफगाणच्या अझमतुल्लाह ओमरझाइने झिम्बाब्वेविरुद्धच्या वनडे मालिकेत 6 बळी मिळविल्याने त्याला 43 स्थानांची बढती मिळाली. तो गोलंदाजांच्या मानांकनात आता 58 व्या स्थानावर पोहोचला आहे. अष्टपैलूंमध्येही त्याने पाच स्थानांची प्रगती केली असून तिसऱ्या स्थानावर पोहोचला आहे.
टी-20 गोलंदाजांमध्ये बांगलादेशच्या मेहिदी हसन व विंडीजचा रॉस्टन चेस यांनी प्रगती केली आहे. हसनने 13 स्थानांची प्रगती करीत दहावे तर चेसने 11 स्थानांची बढत घेत 13 वे स्थान मिळविले आहे. बांगलादेशने विंडीज दौऱ्याची विजयाने सांगता केली. त्यांच्या रिशाद हुसेन व हसन मेहमूद यांनी मानांकनात भरीव प्रगती केली आहे.