बुमराह पुन्हा अग्रस्थानी
वृत्तसंस्था/दुबई
भारताचा अव्वल वेगवान गोलंदाज जसप्रित बुमराहने कसोटी गोलंदाजांच्या मानांकनातील अग्रस्थान पुन्हा मिळविले आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध झालेल्या पहिल्या कसोटीत त्याने 8 बळी मिळवित भारताला सहकाऱ्यांच्या मदतीने 295 धावांनी दणदणीत विजय मिळवून दिला. सामनावीरचा मानकरी ठरलेल्या बुमराहने आयसीसीच्या ताज्या कसोटी मानांकनात दोन स्थानांची प्रगती करीत दक्षिण आफ्रिकेचा कागिसो रबाडा व ऑस्ट्रेलियाचा जोश हॅझलवूड यांना मागे टाकत पहिल्या स्थानावर कब्जा केला. याआधी यावर्षीच्या फेब्रुवारीमध्ये इंग्लंडविरुद्धच्या कसोटीत 9 बळी मिळवित अग्रस्थानावर झेप घेतली होती.
नंतर ऑक्टोबरमध्येही तो काही काळ अग्रस्थानी होता. पण नंतर रबाडाने त्याला मागे टाकत पहिले स्थान मिळविले. बुमराहचा सहकारी मोहम्मद सिराजने दोन्ही डावांत मिळून 5 बळी घेतल्याने क्रमवारीत तीन स्थानांची प्रगती केली. कसोटी गोलंदाजांत तो आता 25 व्या स्थानावर आहे. टॉप टेनच्या बाहेर विंडीजचे वेगवान त्रिकुट जेडेन सील्स (तीन स्थानांची प्रगती करीत 11 वे स्थान), केमार रॉच (चार स्थानांची प्रगती करीत 17 वे), अल्झारी जोसेफ (तीन स्थानांची प्रगती करीत 29 वे) यांनी स्थान मिळविले आहे. बांगलादेशविरुद्धच्या पहिल्या कसोटीत चांगले प्रदर्शन केल्याचा त्यांना फायदा झाला आहे. या कसोटीत तिघांनी मिळून 14 बळी टिपले. बांगलादेशचा वेगवान गोलंदाज तस्किन अहमदनेही एकदम 16 स्थानांची प्रगती करीत 51 व्या स्थानावर पोहोचला आहे.