महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

बुमराह, अश्विन है तो मुमकिन है

06:58 AM Oct 20, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

आज चिन्नास्वामीच्या खेळपट्टीवर भारतीय गोलंदाजांची कामगिरी ठरणार निर्णायक

Advertisement

वृत्तसंस्था/ बेंगळूर

Advertisement

बेंगळूर कसोटीत पहिला डाव एका वाईट स्वप्नासारखा गेल्यानंतर भारतीय फलंदाजांनी दुसऱ्या डावात चमक दाखवली. मात्र शेवटच्या फळीतील फलंदाजांनी हाराकिरी केल्याने भारताला मजबूत आघाडी घेता आली नाही. पहिल्या डावात 46 धावांत गारद झाल्यानंतर दुसऱ्या डावात भारतीय संघाने 402 धावा केल्या. आता, पहिली कसोटी जिंकण्यासाठी न्यूझीलंडला 107 धावांची तर टीम इंडियाला 10 विकेट्सची गरज आहे. खराब प्रकाश आणि मुसळधार पावसामुळे चौथ्या दिवसाचा खेळ वेळेपूर्वीच संपला. चौथ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत न्यूझीलंडने केवळ 4 चेंडू खेळले, ज्यामध्ये संघाला आपले खातेही उघडता आले नाही.

न्यूझीलंडसमोरील 107 धावांचे आव्हान फार कमी वाटत असले तरी ते आव्हान सोपे नाही. विजयासाठीचे टार्गेट पाहिले तर किवीज संघ सहज हे आव्हान पार करेल असे वाटते. पण, पाचव्या दिवशी पावसाचा अंदाज व खेळपट्टी गोलंदाजांना साथ देणारी असल्यामुळे पहिल्या डावात भारतीय संघाची जशी अवस्था झाली तशी वेळ किवीज संघावर येऊ शकते. पाचव्या दिवशी हवामान खात्याने पावसाची शक्यता वर्तवली आहे. याशिवाय, खेळपट्टी गोलंदाजीला पोषक असल्याने बुमराह, अश्विनसह इतर भारतीय गोलंदाजांच्या कामगिरीवर टीम इंडियाचा विजय अवलंबून असणार आहे.

सरफराजचे कसोटीतील पहिले शतक

दिवसाचा खेळ संपेपर्यंत भारताने 3 गडी गमावून 231 धावा केल्या होत्या. चौथ्या दिवशी सरफराज खान व ऋषभ पंतने भन्नाट सुरुवात केली. या जोडीने किवीज गोलंदाजांचा समाचार घेताना तुफानी फटकेबाजी केली. सरफराज खान आणि पंत यांच्यात 177 धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी झाली, ज्यामुळे चौथ्या दिवसाची पहिली दोन सत्रे भारताच्या नावावर राहिली. यादरम्यान, सरफराजने कसोटी कारकिर्दीतील पहिले शतक झळकावले. शतकानंतर हवेत उडी मारत जोरदार सेलिब्रेशन केले. शतकानंतरही त्याचा आक्रमकपणा कायम राहिला. त्याने 195 चेंडूत 18 चौकार व 3 षटकारासह 150 धावांची खेळी साकारली. दुसरीकडे, सरफराज बाद झाल्यानंतर पंत मात्र खेळपट्टीवर उभा होता. पंत आता शतक झळकावणार, असे दिसत होते पण 99 धावांवर खेळत असताना एक चेंडू थोडीशी उसळी घेऊन त्याच्याजवळ आला. पंतने तो चेंडू खेळला, पण त्याच्या बॅटची कडा चेंडूला लागली. त्यानंतर हा चेंडू थेट स्टम्पवर जाऊन आदळला आणि फक्त एका धावेने पंतचे शतक हुकले. पंतने यावेळी 9 चौकार आणि 5 षटकारांच्या मदतीने 99 धावांची खेळी साकारली.

54 धावांत 7 विकेट गमावल्या

सरफराज बाद झाला तेव्हा भारताची 4 बाद 408 अशी स्थिती होती. सरफराजची विकेट पडल्यानंतर टीम इंडिया संघर्ष करताना दिसली. परिस्थिती अशी होती की भारताने शेवटच्या 7 विकेट केवळ 54 धावांत गमावल्या. चौथ्या दिवसाच्या शेवटच्या सत्रात केएल राहुलला 12 तर रवींद्र जडेजालाही केवळ 5 धावा करता आल्या. अश्विनने 15 धावा केल्या तर इतर तळाचे फलंदाज अपयशी ठरले. अशाप्रकारे टीम इंडियाचा दुसरा डाव 462 धावांवर आटोपला.

न्यूझीलंडसमोर 107 धावांचे लक्ष्य

एकेकाळी भारतीय संघ खूपच मजबूत स्थितीत असल्याचे दिसत होते. मात्र चौथ्या दिवसाच्या शेवटच्या सत्राने सामना न्यूझीलंडच्या हातात गेला. किवी संघाला चौथ्या डावात विजयासाठी 107 धावा करायच्या आहेत. चौथ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत पाहुण्या संघाला केवळ 4 चेंडू खेळता आले. न्यूझीलंडला एकही षटक खेळता आले नाही, तेव्हा मैदानावर दाट काळे ढग आले. अशा परिस्थितीत खराब प्रकाशामुळे पंचांनी वेळेआधीच स्टंप घोषित केले.

संक्षिप्त धावफलक

भारत प.डाव 46 व दुसरा डाव 99.1 षटकांत सर्वबाद 462 (जैस्वाल 35, रोहित 52, विराट 70, सरफराज खान 150, ऋषभ पंत 99, अश्विन 15, मॅट हेन्री व ओ रुके प्रत्येकी तीन गडी, एजाज पटेल 2 बळी).

न्यूझीलंड पहिला डाव 402 व दुसरा डाव बिनबाद 0.

मैदानावर फेरी, हवेत उडी, सरफराजचे जोरदार सेलिब्रेशन

सरफराज खान हे नाव गेल्या काही वर्षांपासून चर्चेत आहे. सरफराजने देशांतर्गत क्रिकेटमध्ये मुंबईसाठी दमदार कामगिरी करताना खोऱ्याने धावा केल्या आहेत. यंदाच्या वर्षी इंग्लंडविरुद्ध कसोटीत त्याला पदार्पणाची संधी मिळाली. पदार्पणाच्या पहिल्याच सामन्यात त्याने अर्धशतक ठोकले. त्याने या मालिकेत दोन अर्धशतकं केली. यानंतर आता, न्यूझीलंडविरुद्ध पहिल्या कसोटीत कारकिर्दीतील पहिले शतक साजरे केले आहे. विशेष म्हणजे, भारताकडून खेळणे व शतक झळकावणे सरफराजचे स्वप्न होते. हे स्वप्न सत्यात उतरवताना 26 वर्षीय सरफराजने 110 चेंडूत आपले शतक पूर्ण केले. शतक पूर्ण केल्यानंतर त्याने आनंदाने उंच उडी मारली आणि मैदानात धावायला सुरुवात केली. यानंतर त्याने आपली बॅट हवेत फिरवत सेलिब्रेशन केले. सरफराजने देशांतर्गत क्रिकेटमध्ये अने शतके झळकावली आहेत पण त्याचे हे पहिले आंतरराष्ट्रीय शतक ठरले. त्यामुळे हा क्षण त्याच्यासाठी सर्वात खास होता, जो त्याने अशा पद्धतीने साजरा केला.

ऋषभ पंतचा एका चेंडूने घात केला

न्यूझीलंडविरुद्ध पहिल्या कसोटी सामन्यात ऋषभ पंतचे शतक अवघ्या एका धावेने हुकले. एका चेंडूने त्याचा घात केला. त्याने 105 चेंडूत 99 धावा केल्या, विल्यम ओ‘रुकेने त्याला क्लीन बोल्ड केले. दरम्यान, पंतने आपले शतक पूर्ण केले असते तर त्याचे कसोटी कारकिर्दीतील हे 7 वे शतक ठरले असते. यानंतर तो भारतासाठी कसोटीत सर्वाधिक शतके करणारा यष्टिरक्षक बनला असता, पण तो नर्व्हस 90 चा बळी ठरला. सध्या, पंत आणि महेंद्रसिंग धोनी या दोघांनी यष्टिरक्षक म्हणून त्यांच्या कसोटी कारकिर्दीत प्रत्येकी एकूण 6 शतके झळकावली आहेत. याशिवाय, पंत कसोटीत नर्व्हस नाईन्टीजचा बळी होण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधी तो अनेक वेळा कसोटीत 90 ते 100 धावांच्या दरम्यान बाद झाला आहे. पंत कसोटीत नर्व्हस नाईन्टीजमध्ये बाद होण्याची ही सातवी वेळ आहे.

खेळ थांबवल्यामुळे अंपयार्सवर भडकला रोहित शर्मा

न्यूझीलंडचा संघ जेव्हा लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरला, तेव्हा ढगाळ वातावरणामुळे चेंडू खूप स्विंग होत होता. बुमराह शानदार गोलंदाजी करत होता. त्याच्या एका बॉलवर रिव्युव्ह घेण्यात आला होता, ज्यात फलंदाज थोडक्यात वाचला. मात्र, 4 चेंडू टाकताच पंचांनी खराब प्रकाशामुळे सामना थांबवला. आकाशात काळ्या ढगांमुळे प्रकाश कमी झाला होता. यावर भारतीय कर्णधार रोहित शर्मा नाखूश दिसला. यावेळी टीम इंडियानं गोलंदाजी केली, तर त्यांना विकेट मिळण्याची शक्यता अधिक आहे, असे त्याला वाटत होतं. या कारणावरून त्यानं पंचांशी बराच वेळ वाद घातला. मात्र पंचांनी रोहित शर्माचं ऐकलं नाही आणि खेळ थांबवला. यानंतर काही वेळातच मुसळधार पाऊस सुरू झाला आणि सामना होण्याची सर्व शक्यता संपली.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article