महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

चेन्नई सुपर किंग्जसची मुंबईत ‘दादागिरी’

09:44 AM Apr 15, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

यजमान मुंबई इंडियन्सचा 20 धावांनी पराभव, धोनीच्या 20 धावा ठरल्या निर्णायक, सामनावीर पथिरानाचे 4 बळी

Advertisement

वृत्तसंस्था/ मुंबई

Advertisement

कर्णधार हार्दिक पंड्याने टाकलेल्या शेवटच्या षटकातील शेवटच्या चार चेंडूवर धोनीने झोडपलेल्या 20 धावा निर्णायक ठरल्याने चेर्न्नई सुपरकिंग्सने मुंबई इंडियन्सवर 20 धावांनी विजय मिळविला. 28 धावांत 4 बळी मिळविणारा पथिराना सामनावीराचा मानकरी ठरला. याशिवाय शिवम दुबे आणि ऋतुराज गायकवाड यांनीही शानदार अर्धशतके नोंदवत विजयात मोलाची भूमिका बजावली. मुंबईच्या रोहित शर्माने एकाकी लढत देत झळकवलेले नाबाद शतक मात्र वाया गेले. चेन्नई संघाने मुंबईला विजयासाठी 207 धावांचे आव्हान दिले होते.  त्यानंतर मुंबई इंडियन्सने 20 षटकात 6 बाद 186 धावापर्यंत मजल मारली. रोहित शर्माने 63 चेंडूत 5 षटकार आणि 11 चौकारासह नाबाद 105 धावा झळकविल्या तर तिलक वर्माने 31, इशान किशनने 23, टिम डेव्हिडने 13 धावा फटकावल्या. या पराभवामुळे मुंबई इंडियन्सची गुणतक्त्यात आठव्या स्थानावर घसरण झाली आहे.

मुंबईची अर्धशतकी सलामी

मुंबई संघाने आपल्या डावाला दमदार सुरूवात करून दिली. रोहित शर्मा आणि इशान किशन यांनी 43 चेंडूत 70 धावांची भागीदारी केली. पथिरानाने इशान किशनला झेलबाद केले. त्याने 15 चेंडूत 1 षटकार आणि 3 चौकारासह 23 धावा जमविल्या. पथिरानाने आपल्या या षटकातील तिसऱ्या चेंडूवर सुर्यकुमार यादवला खाते उघडण्यापूर्वीच तंबूचा रस्ता दाखविला. रेहमानने सीमारेषेवर  यादवचा हा अप्रतिम झेल टिपला. एका बाजूने रोहित शर्मा आक्रमक फलंदाजी करत होता. तिलक वर्माने रोहित शर्मासमवेत तिसऱ्या गड्यासाठी 60 धावांची भागीदारी केली. पथिरानाने तिलक वर्माला ठाकुरकरवी झेलबाद केले. त्याने 20 चेंडूत 5 चौकारासह 31 धावा जमविल्या. कर्णधार हार्दिक पंड्या तुषार देशपांडेच्या गोलंदाजीवर केवळ 2 धावा जमवित जडेजाकरवी झेलबाद झाला. टिम डेव्हिडने 5 चेंडूत 2 षटकारांसह 13 जमविल्या. रेहमानने त्याला झेलबाद केले. नंतर पथिरानाने शेफर्डचा त्रिफळा उडवित मुंबईच्या अडचणीत आणखी भर घातली. मोहम्मद नबी 4 धावावर नाबाद राहिला. शर्माने शेवटच्या षटकात आपले शतक साजरे केले. रोहित शर्माने टी-20 प्रकारात 500 षटकार नोंदविण्याचा पराक्रम केला आहे.

मुंबईच्या डावामध्ये 8 षटकार आणि 19 चौकार नोंदविले गेले. मुंबईने पॉवरप्लेच्या 6 षटकात 63 धावा जमविल्या. मुंबईचे अर्धशतक 30 चेंडूत, शतक 62 चेंडूत, दीडशतक 101 चेंडूत फलकावर लागले. शर्मा आणि इशान किशन यांनी 30 चेंडूत अर्धशतकी भागीदारी केली. शर्माने 30 चेंडूत 2 षटकार आणि 7 चौकारासह अर्धशतक झळकविले. तसेच त्याने 61 चेंडूत 5 षटकार आणि 10 चौकारासह शतक पूर्ण केले. मुंबई इंडियन्सने मधवालच्या जागी सूर्यकुमार यादवला इम्पॅक्ट खेळाडू म्हणून मैदानात उतरविले. चेन्नईतर्फे पथिरानाने 28 धावात 4, तर देशपांडे आणि रेहमान यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.

दुबे, गायकवाडची अर्धशतके

तत्पूर्वी, रविवारच्या या 29 व्या सामन्यात मुंबई इंडियन्सने नाणेफेक जिंकून चेन्नईला प्रथम फलंदाजी दिली. चेन्नईने या सामन्यासाठी सलामीच्या जोडीत बदल केला. रचिन रवींद्रबरोबर अजिंक्य रहाणेला सलामीला पाठविले पण हा प्रयोग यशस्वी ठरला नाही. डावातील दुसऱ्या षटकातच मुंबईच्या कोत्झीने रहाणेला 5 धावावर पंड्याकरवी झेलबाद केले. त्यानंतर रचिन रवींद्र आणि कर्णधार गायकवाड यांनी दुसऱ्या गड्यासाठी 52 धावांची भागीदारी 37 चेंडूत नोंदविली. गोपालच्या गोलंदाजीवर रचिन रवींद्र्र यष्टीरक्षक इशान किशनकरवी झेलबाद झाला. त्याने 16 चेंडूत 1 षटकार आणि 2 चौकारासह 21 धावा जमविल्या.

कर्णधार गायकवाड आणि शिवम दुबे या जोडीने केवळ 45 चेंडूत तिसऱ्या गड्यासाठी 90 धावांची भागीदारी केली. गायकवाडने 40 चेंडूत 5 षटकार आणि 5 चौकारासह 69 धावा झोडपल्या. हार्दिक पंड्याने त्याला नबीकरवी झेलबाद केले. गायकवाड बाद झाल्यानंतर मैदानात आलेल्या मिचेलने 14 चेंडूत 1 चौकारासह 17 धावा जमविल्या. पंड्याने त्याला नबीकरवी झेलबाद केले. मिचेल आणि दुबे यांनी चौथ्या गड्यासाठी 24 चेंडूत 36 धावांची भर घातली. 19 व्या षटकापर्यंत चेन्नईला 200 धावांचा टप्पा गाठणे अवघड वाटत होते. डावातील शेवटचे षटक हार्दिक पंड्याने टाकले. तर मिचेल बाद झाल्यानंतर मैदानात आलेल्या धोनीने पंड्याच्या षटकातील शेवटच्या 4 चेंडूत 3 षटकारांसह नाबाद 20 धावा झोडपल्याने चेन्नईला 206 धावापर्यंत मजल मारता आली. दुबेने 38 चेंडूत 2 षटकार आणि 10 चौकारांसह नाबाद 66 धावा झळकविल्या. चेन्नईच्या डावात अवांतर 8 धावा मिळाल्या. मुंबईचा गोलंदाज शेफर्ड महागडा ठरला. शिवम दुबेने त्याच्या एका षटकात 2 चौकारासह 12 धावा घेतल्या तर शेफर्डच्या दुसऱ्या षटकात दुबेने 2 षटकार आणि 2 चौकार ठोकले. शेफर्डने आपल्या दोन षटकात 33 धावा दिल्या.

चेन्नईने पॉवरप्लेच्या 6 षटकात 48 धावा जमविताना 1 गडी गमविला. चेन्नईचे अर्धशतक 40 चेंडूत, शतक 72 चेंडूत, दिडशतक 91 चेंडूत तर द्विशतक 119 चेंडूत फलकावर लागले. रचिन रवींद्र आणि गायकवाड यांनी 36 चेंडूत दुसऱ्या गड्यासाठी अर्धशतकी भागीदारी केली. गायकवाडने आपले अर्धशतक 4 षटकार आणि 3 चौकाराच्या मदतीने 33 चेंडूत नोंदविले. गायकवाड आणि दुबे यानी तिसऱ्या गड्यासाठी अर्धशतकी भागीदारी 30 चेंडूत पूर्ण केली. दुबेने अर्धशतक 2 षटकार आणि 7 चौकाराच्या मदतीने 28 चेंडूत झळकविले. चेन्नईच्या डावात 11 षटकार, 19 चौकार नोंदविले गेले. मुंबईतर्फे हार्दिक पंड्याने 2 तर कोत्झी आणि गोपाल यांनी प्रयेकी 1 गडी बाद केला.

संक्षिप्त धावफलक : चेन्नई सुपर किंग्ज 20 षटकात 4 बाद 206 (रहाणे 5, रचिन रवींद्र 21, गायकवाड 69, दुबे नाबाद 66, मिचेल 17, धोनी 4 चेंडूत नाबाद 20, अवांतर 8, पंड्या 2-43, गोपाल 1-9, कोत्झी 1-35). मुंबई इंडियन्स 20 षटकात 6 बाद 186 (रोहित शर्मा नाबाद 105, इशान किशन 23, तिलक वर्मा 31, डेव्हिड 13, शेफर्ड 1, नबी नाबाद 4, पाड्या 2, अवांतर 7, पथिराना 4-28, देशपांडे 1-29, रेहमान 1-55).

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article