महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

उच्चांकी शेअरबाजार: सावधानता हवी

06:30 AM Dec 22, 2023 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

भारतीय शेअर बाजाराने आता 71,000 चा टप्पा ओलांडला असून 2025 च्या नाताळसाठी येणारा सांताक्लॉज ‘1 लाख सेन्सेक्स’ ही भेट आपल्या पोतडीतून आणू शकेल, असा भक्कम आशावाद व्यक्त केला जातो. शेअर बाजारातील वर्षाअखेरची ही नवी उच्चांक पातळी नेमक्या कोणत्या घटकांनी प्रेरित असून त्याचा अन्वयार्थ सर्वसामान्य, छोट्या गुंतवणूकदारांच्या दृष्टीने पाहणे महत्त्वाचे ठरते. शेअर बाजाराची ही लक्षवेधक झेप अनेकांना आपली गुंतवणूक चांगलीच वाढल्याचा आनंद देणारी आहे. तशीच आता पुढे काय? घसरण होणार का? या प्रश्नाने चिंतीत करणारी आहे. शेअर बाजार नेहमी ‘जोखीम’ क्रमप्राप्त असला तरी यामध्ये लाभसत्र किंवा परतावादेखील सातत्यपूर्ण व आकर्षक दिला आहे हे वास्तव आहे. भारतीय गुंतवणुकदारांची मंदगतीने बदलणारी गुंतवणूक वर्तनशीलता ही अर्थप्रगतीची पाया ठरणार असल्याने शेअरबाजारातील ही तेजी तपशीलाने समजून घेणे महत्त्वाचे ठरते!

Advertisement

सेन्सेक्सचा प्रवास

Advertisement

25 जुलै 1990 रोजी सेन्सेक्स किंवा मुंबई शेअर बाजाराचा संवेदनशील सुचकांक 1000 चा टप्पा गाठला. त्यानंतर 33 वर्षाच्या कालावधीत 71,000 चा टप्पा पार करीत लक्षपूर्ती (100000) साध्य करण्याकडे झेपावत असला तरी या प्रवासात अनेक आपत्ती, अडचणी यातून ही मार्गक्रमणा केली आहे. हर्षद मेहता, केतन पारेख, शेअर्स घोटाळा, कारगिल युद्ध, मुंबई दहशतवादी हल्ला, संसदेवर हल्ला, 2008 चे जागतिक गृहकर्ज संकट, कोविडची महामारी अशा सर्व घटनांना वळसे देत शेअरबाजाराची ‘श्री’ वाढत आहे. निफ्टी हा राष्ट्रीय शेअर बाजाराचा सूचकांक आपला 1000 अंशाचा टप्पा पार करण्यास केवळ 8 व्यवहारसत्रे वापरली असून यापूर्वी 14 हजार ते 15000 ही वाटचाल 5 व्यवहारसत्रात पूर्ण केली. अर्थात बाजारात सुस्तपणा अनेकवेळा दिसतो. 11 हजार ते 12 हजार ही निफ्टीची वाटचाल करण्यास 60 व्यवहारसत्रे लागली! साधारणपणे 1000 ची निफ्टीतील वाढ 25 व्यवहारसत्रात होते. भारतीय उद्योग व्यवसायात होणारी गुंतवणूक व त्यासाठी असणारे पोषक वातावरण यातूनच सातत्याने वार्षिक 15 टक्के चक्रवाढ दराचा परतावा भारतीय शेअरबाजार देत राहिला आहे!

कारणमीमांसा

शेअर बाजारातील चढउतार ही सर्वसाधारण बाब असून एकूण गुंतवणूक प्रवाहावर ती अवलंबून असते. देशांतर्गत तसेच जागतिक घडामोडी, धोरणात्मक बदल यांच्या प्रभावातून बाजाराची दिशा ठरते. शेअर बाजारातील तेजीचे सत्र ही जागतिक स्तरावर व राष्ट्रीय स्तरावर एकाचवेळी सकारात्मक बदल झाल्याने मोठ्या बदलाचे कारण ठरले. अमेरिकेचे व्याजदर धोरण किंवा फेडरेट आता दिलासादायक वळण (डोविश) घेत असून मार्च 2024 मध्ये 0.25 टक्क्यांने व्याजदर कमी होणे शक्य आहे. याच पद्धतीने भारताचे चलन धोरण शक्तीकांतदास यांनी जाहीर केले असल्याने भांडवलबाजारास सकारात्मक बदलाचे संकेत मिळाले. भारताचा विकासदर अपेक्षेपेक्षा चांगला 7.1 टक्के असण्याची घटनादेखील प्रेरक ठरली.

मोठ्या आकाराच्या आणि वेगवान विकास दरात भारताने आपला प्रथम क्रमांक गाठला व भांडवल बाजाराने 4 लाख कोटीचा टप्पा पार केला. एकूण राष्ट्रीय उत्पन्नाशी भांडवल बाजाराचे प्रमाण 110 टक्केपर्यंत वाढले. गुंतवणुकीस आपले पायाभूत क्षेत्रात भरीव वाढ करण्याचे (कॅपेक्स) धोरण विदेशी गुंतवणूकदारांना  आकर्षक वाटले यात नवल नाही. विशेषत: चीनमधून गुंतवणूक बाहेर पडत असून त्याचा भारत हा सर्वात मोठा लाभार्थी असल्याचे मत अमेरिकन गुंतवणूक तज्ञाने म्हटले आहे. विदेशी संस्थार्गत गुंतवणूकदार (एफआयआय) हे बाजाराचे दिशादर्शक असतात. त्यांनी गेल्या 5 व्यवहार सत्रात सातत्याने गुंतवणूक वाढ केली व 9339 कोटीची नक्त वाढ केली. त्यांनी 28 हजार कोटीची विक्री तर 38 हजार कोटीची खरेदी केली. याच कालखंडात देशांतर्गत गुंतवणूक संस्था (डीआयआय) यांनी 14 हजार कोटीची विक्री व 11 हजार कोटीची खरेदी म्हणजे 3000 कोटीची विक्री केली. एकूण विदेशी गुंतवणुकीत झालेली वाढ सेन्सेक्स 71 हजार पातळी ओलांडण्यास महत्त्वाची ठरली. यात डॉलर इंडेक्स म्हणजे डॉलरची महागाई कितपत घटते यावरही भारतीय भांडवल बाजारात गुंतवणूक प्रमाण ठरते. डॉलर इंडेक्समधील घट, तेल किंमतीत झालेली घट ही कारणेदेखील शेअर बाजार उंचावण्यास मदत करणारे ठरले.

निवडणूकांचा संदर्भ

आर्थिक निर्णय प्रक्रियेमागे राजकीय संदर्भ नेहमीच महत्त्वाचे असतात. मध्यप्रदेश, राजस्थान व छत्तीसगढचे निकाल सध्याच्या भाजप आघाडीस बळकट करणारे ठरले. सातत्य हे मोठे आश्वासक ठरते. त्यामुळे निकाल स्पष्ट होताच सेन्सेक्स वधारला. राजकीय चौकटीत शेअरबाजाराचा परतावा पाहणे मनोरंजक ठरते. विविध पंतप्रधानांचा कालावधी व त्या कालावधीत सेन्सेक्सने दिलेला परतावा पाहिला तर हे समजू शकते. भाजपच्या अटलबिहारी वाजपेयी यांच्या 13 दिवसाची कारकीर्द  उणे 2.6 टक्के परतावा देणारी अपवादात्मक बाब सोडली तर सर्वाधिक परतावा पी. व्ही. नरसिंह राव यांच्या कालावधीत 180 टक्के तर राजीव गांधी यांच्या काळात 170 टक्के, मनमोहन सिंग यांच्या काळात 168 टक्के आणि मोदी यांच्या पहिल्या पर्वात 60 टक्के तर दुसऱ्या पर्वात 75 टक्के वाढ झाली!

पुढे काय?

शेअर बाजार ही नेहमी चढउताराची जोखीम असणारी परंतु दीर्घ काळात सर्वात चांगला परतावा देणारी असते हे लक्षात घेतल्यास 71500 हा देखील टप्पा असून ‘पिक्चर अभी बाकी है’ हे सत्य आहे. याच काळात अनेक छोट्या गुंतवणूकदारांना बाजारात सल्ला देणारे स्वयंभू सल्लागार वाढतात. यांच्यापासून आपण सावध असणे आवश्यक आहे. सुमार कंपन्यांचेही शेअर वाढत असल्याने असे शेअर न घेता आपल्याकडील कमी गुणवत्तेचे विकणे अधिक योग्य ठरते. जेथे परतावा खूप मोठा दिसतो तेथे देखील नफा वसुली धोरण आवश्यक ठरते. विशेषत: कंपनी किंवा उद्योगक्षेत्र निहाय कल अभ्यासणे व त्यातून गुंतवणूक रचना अधिक बळकट करणे याबाबी करणे गरजेचे असते. येणारा पुढील 6 महिन्याचा कालावधी मोठ्या चढउताराचा असण्याची शक्यता गृहीत धरता बाजारात ‘घसरण’ शक्यता दिसते. अशावेळी पुन्हा चांगल्या शेअर्समध्ये आपली गुंतवणूक वाढवण्याची संधी मिळते. बाजारात अधिक शिस्तबद्ध, संयमितपणे गुंतवणूक करण्यास म्युच्युअल फंड चांगले साधन ठरते. अद्यापि फक्त 7 टक्के भारतीय गुंतवणूकदारच वाढत्या भांडवलबाजाराचा लाभ घेत असून आपण त्यात नसाल तर मोठी संधी उपलब्ध असून वापरत नाही, असे ठरते.

भांडवल बाजाराचा विश्वचषक भारताकडे असून आपण या संघात सामील असाल तर उत्तम.पण नसाल तर सहभागी व्हा. पण सावधानता हवीच! सातत्यपूर्ण व उत्तम परतावा शेअर बाजार देत असून सावधपूर्वक, अभ्यासपूर्वक गुंतवणूक दीर्घकालीन समृद्धी देशाला व गुंतवणुकदाराला देत असते. मात्र अति अल्पकाळात श्रीमंत होण्याचे स्वप्न नेहमीच फसवे असते, हे लक्षात ठेवणे आवश्यक आहे.

प्रा. डॉ. विजय ककडे

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article