आमदाराच्या बॅगेत मिळाल्या बंदुकीच्या गोळ्या
श्रीनगर विमानतळावर सुरक्षा दलांनी घेतले ताब्यात
वृत्तसंस्था/श्रीनगर
श्रीनगर विमानतळावर नॅशनल कॉन्फरन्सचे आमदार बशीर वीरी यांना ताब्यात घेण्यात आले आहे. तपासणीदरम्यान त्यांच्या बॅगेत बंदुकीच्या गोळ्या सापडल्या आहेत. बिजबेहराचे आमदार वीरी हे जम्मू येथे जात असताना तपासणीदरम्यान विमानतळाच्या सुरक्षा कर्मचाऱ्यांना त्यांच्या बॅगेत बंदुकीच्या गोळ्या आढळून आल्यावर त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे. पोलिसांनी त्यांची चौकशी सुरू केली आहे. बशीर वीरी यांच्याकडे बंदुकीच्या गोळ्या कुठून आल्या याचा तपास आता पोलीस करत आहेत. वीरी यांच्याकडे परवानायुक्त बंदुक असून त्याच्या गोळ्या चुकून बॅगेत राहिल्याचा दावा केला जा आहे. तर तपास सुरू असून विस्तृत माहिती मिळाल्यावरच यासंबंधी टिप्पणी करता येईल असे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. डॉ. बशीर वीरी यांनी अलिकडेच बिजबेहरा मतदारसंघात पीडीपीच्या नेत्या इल्तिजा मुफ्ती यांना पराभूत केले होते. इल्तिजा या मेहबूबा मुफ्ती यांच्या कन्या आहेत. बिजबेहरा हा मतदारसंघ पीडीपीचा पारंपरिक बालेकिल्ला म्हणून ओळखला जात होता. याचमुळे इल्तिजा यांचा पराभव अनेकांना चकित करणारा ठरला आहे.