कळंगुटमध्ये 19 दुकानांच्या अतिक्रमणांवर बुलडोझर
रस्त्याच्या कामात ठरत होती अडथळा
म्हापसा : गौरावाडा-कळंगुट येथे बेकायदेशीरपणे विस्तार करून अतिक्रमण केलेल्या आणि रस्ता ऊंदीकरणात अडथळा निर्माण करणाऱ्या 22 दुकानांवर बुलडोझर फिरवण्यात आला. गुऊवारी न्यायालयाने दिलेल्या आदेशानंतर ही कारवाई करण्यात आली. दरम्यान कारवाईपूर्वी पंचायतीने विश्वासात घेतले नसल्याचा आरोप यावेळी स्थानिकांनी केला. पंचायतीने केलेल्या सर्व्हेमध्ये एकूण 23 व्यावसायिकांनी बेकायदेशीरपणे आपल्या दुकानांचा विस्तार केल्याचे आढलून आले होते. त्या सर्वांना सुऊवातीला नोटिसा बजावण्यात आल्या. नंतर कारवाई करण्याबाबतची नोटिस पंचायतीने बजावली होती. त्यातील चार व्यावसायिकांनी न्यायालयात धाव घेतली. त्यापैकी एकालाच स्थगिती मिळवता आली. या परिसरात बऱ्याच व्यावसायिकांनी फूटपाथवर अतिक्रमण केले होते. ती अतिक्रमणे हटविण्यात आली. कारवाई केलेल्या बांधकामांमध्ये विस्तारित दुकाने, शौचालये, लहान खोल्यांचा समावेश आहे. गुऊवारी सकाळी ही कारवाई सुरू झाली. त्यावर देखरेख ठेवण्यासाठी पंचायत, मामलेदार कार्यालय, गटविकास कार्यालयातील अधिकारी उपस्थित होते. कडक पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. कारवाई शुक्रवारपर्यंत सुरूच राहणार आहे.
पंचायत सचिव अर्जुन वेळीप यावेळी कारवाईबाबत म्हणाले की, आजची कारवाई ही उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार होती. या कारवाई आधी रस्त्याच्या ऊंदीकरणात अडथळा ठरणाऱ्या दुकानदारांना रितसर नोटीसा पाठवून ती पाडण्याची कल्पना देण्यात आली होती. त्यामुळे कळंगुट पंचायत मंडळांकडून दुकानदारांना कल्पना न देता आजची कारवाई केल्याचा आरोप खोटा आहे. ही कारवाई यापुढेही सुरूच राहाणार आहे त्यामुळे रस्त्याच्या ऊंदीकरणात अडथळा ठरणाऱ्यांनी स्वत:हून आपली दुकाने हटविण्याची तयारी करावी, असेही ते म्हणाले.
स्थानिक ग्रामस्थ दयानंद शिरोडकर म्हणाले की, कळंगुट पंचायत मंडळ उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार कारवाई करण्यात येत असल्याचे गेले चार महिने सांगत आहे परंतु आजच्या कारवाईची पुसटशीही कल्पना स्थानिक दुकानदारांना पंचायत मंडळांकडून देण्यात आली नव्हती. त्यामुळे या कारवाईत अनेकांचे लाखोंचे नुकसान झाल्याचा दावा दयानंद शिरोडकर या वयोवृद्ध ग्रामस्थाने केला.