तेंडोली - खरावतेवाडीत बिबट्याच्या हल्ल्यात बैल ठार
वार्ताहर/कुडाळ
तेंडोली-खरावतेवाडी येथील घरापासून काहीशा जंगलमय भागात चरण्यासाठी सोडलेल्या शेतकरी संजय राऊळ यांच्या बैलावर बिबट्याने हल्ला केला. या हल्ल्यात बैलाचा मृत्यू झाला आहे. ही घटना गुरुवारी सायंकाळी उशीरा घडली. यात राऊळ यांचे मोठे नुकसान झाले आहे. लोकवस्तीपासून काहीशा अंतरावर ही घटना घडल्याने खरावतेवाडी परिसरातील शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे.तेंडोली-खरावतेवाडी येथील शेतकरी संजय राऊळ यांनी नेहमीप्रमाणे सायंकाळी घरानजीकच्या काहीशा जंगलमय भागात गुरांना चरण्यासाठी सोडले होते. त्यांची पाच गुरे आहेत. त्यातील चार गुरांना घेऊन ते सायंकाळी घरी येण्यास निघाले. त्यातील एक बैल चरत मागेच राहिला. तो बाकीच्या गुरांच्या मागून येईल असा त्यांचा समज झाला. त्यामुळे त्यांनी त्याच्याकडे दुर्लक्ष केला. काहीवेळातच ते चार गुरांना घेऊन घरी परतले. परंतु मागे राहिलेला त्यांचा एक बैल आलाच नाही, म्हणून त्यांनी त्याची शोधाशोध सुरु केली. ज्या भागात त्यांनी गुरांना चरायला नेले होते त्या भागात व आजूबाजूच्या परिसरात बैल आढळला नाही. परंतु तोपर्यंत अंधार झाला होता. त्यानंतर रात्री उशीरापर्यंत त्यांनी त्याचा शोध सुरु ठेवला. आजूबाजूच्या लोकांकडे चौकशी केली. परंतु त्याचा शोध लागला नाही. दुसऱ्यादिवशी सकाळी त्यांनी पुन्हा त्याच भागात गुरांना चरायला नेले. त्यांनी आपल्यासोबत जाताना कुत्र्यांना नेले होते. त्यावेळी त्यांच्यासोबत गेलेले कुत्रे झुडुप असलेल्या भागाच्या दिशेने भुंकत धावत गेले. त्यावेळी त्यांना संशय येऊ लागला. त्यांनी लागलीच त्या दिशेने धाव घेतली. त्यावेळी त्यांना त्याठिकाणी त्यांचा बैल जमिनीवर मृता अवस्थेत पडलेला दिसला. त्याला पाहून त्यांना धक्काच बसला. त्यांनी त्याची जवळ जाऊन पाहणी केली असता त्याचा मागील भाग बिबट्याने खाल्लेला होता. त्यांनी याबाबत लागलीच घरच्यांना व शेजारच्याना दूरध्वनीवरून कल्पना दिली. त्यावेळी घरच्यांनी व शेजारील लोकांनी त्याठिकाणी धाव घेतली. त्यानंतर तेथे जमलेल्या ग्रामस्थांनी तेंडोलीचे पशुवैद्यकीय अधिकारी संजय चव्हाण व नेरुरचे वनविभागाचे अधिकारी सचिन पाटील यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधला. त्यांनी बैलाची पाहणी करून पंचनामा केला. बिबट्याने त्याच्यावर हल्ला केला असावा असा अंदाज त्यांनी व्यक्त केला. साधारण 18 ते 20 हजार रुपये किंमतीचा हा बैल आहे. बिबट्याच्या हल्ल्यात राऊळ यांचे मोठे नुकसान झाले. त्यामुळे त्यांना प्रशासनाकडून नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी होत आहे.तेंडोली परिसरात वन्य प्राण्यांचा वावर वाढला आहे. त्यामुळे या भागातील शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. बिबट्याचा संचार वाढल्यामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे. अशा उपद्रवी प्राण्यांचा वनविभागाने तात्काळ बंदोबस्त करावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.