बल्गेरियाच्या रुझेदीचे सलग सहावे सुवर्ण
विश्व पॅरा अॅथलेटिक्स स्पर्धा : मलेशियाच्या रोमलीला लांबउडीत सुवर्ण
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
येथे सुरु असलेल्या विश्व पॅरा अॅथलेटिक्स चॅम्पियनशिप स्पर्धेत बल्गेरियाचा अॅथलीट रुझेदीने पुरुषांच्या एफ-55 गटातील गोळाफेक प्रकारात सलग सहाव्यांदा सुवर्णपदकावर आपले नाव कोरताना नवा विश्वविक्रम केला. मलेशियाच्या अब्दुल लतिफ रोमलीने पुरुषांच्या टी-20 गटातील लांबउडी प्रकारात सुवर्णपदक मिळविले.
बल्गेरियाचा 34 वर्षीय रुझेदीने पुरुषांच्या एफ-55 गटातील गोळाफेक प्रकारात सहाव्या आणि शेवटच्या प्रयत्नात 12.94 मी. ची नोंद करत नवा विश्वविक्रम नोंदविताना 2023 साली पॅरिसमध्ये झालेल्या विश्व पॅरा अॅथलेटिक्स चॅम्पियनशिप स्पर्धेतील या क्रीडा प्रकारात स्वत: नोंदविलेला 12.68 मी. चा विश्वविक्रम मोडीत काढला. नवी दिल्लीत सुरु असलेल्या या स्पर्धेत रविवारी पुरुषांच्या एफ-55 गटातील गोळाफेक प्रकारात सर्बियाच्या ड्युरिकने 12.52 मी. चे अंतर नोंदवित रौप्यपदक तर पोलंडच्या लेच स्टोल्टमनने 12.02 मी. चे अंतर नोंदवित कांस्यपदक पटकाविले. बल्गेरियाच्या रुझेदीला एका वाहन दुर्घंटनेत गंभीर दुखापत झाली होती आणि तो दिव्यांग बनला. 2015 साली डोहा येथे झालेल्या विश्व पॅरा अॅथलेटिक्स चॅम्पियनशिप स्पर्धेपासून आतापर्यंत झालेल्या प्रत्येक अशा स्पर्धेत या क्रीडा प्रकारात सुवर्णपदक मिळविले आहेत. रूझेदीने तिसऱ्यांदा नव्या विश्वविक्रमासह सुवर्णपदक घेतले आहे. त्याचप्रमाणे पुरुषांच्या टी-20 गटातील लांबउडी प्रकारात 28 वर्षीय मलेशियाच्या रोमलीने या स्पर्धेच्या इतिहासात आतापर्यंत 5 सुवर्ण आणि 1 रौप्यपदक मिळवून आपली मक्तेदारी कायम राखील आहे. दुबईत 2019 साली झालेल्या विश्व पॅरा अॅथलेटिक्स चॅम्पियनशिप स्पर्धेत मात्र रोमलीला सुवर्णपदकापासून वंचित व्हावे लागले होते. या स्पर्धेतील रविवारी दुसऱ्या दिवशी सकाळच्या सत्रामध्ये विविध क्रीडा प्रकारात तीन नवे विश्वविक्रम नोंदविले गेले.
मलेशियाचा अब्दुल लतिफ रोमलीने पुरुषांच्या टी-20 गटातील लांबउडी प्रकारात नव्या विश्वविक्रमासह सुवर्णपदक पटकाविले. अब्दुल लतिफने या स्पर्धेत सलग तिसऱ्यांदा या क्रीडा प्रकारात सुवर्णपदकाची हॅट्ट्रीक साधली. त्याने या क्रीडा प्रकारात 7.67 मी. ची नोंद करत नवा विश्वविक्रम केला.
पुरुषांच्या टी-12 गटातील गोळाफेक प्रकारात युक्रेनच्या होलोडिमेर पोनोमॅरेंकोने 17.39 मी. चे अंतर नोंदवित नवा विश्वविक्रम करत सुवर्णपदक मिळविले. त्याने या क्रीडा प्रकारात दुसऱ्या प्रयत्नात हे अंतर गाठले. महिलांच्या एफ-57 थाळीफेक प्रकारात अल्जेरियाच्या नसिमा सैफीने सुवर्णपदकाची दुहेरी हॅट्ट्रीक साधली. तिने या क्रीडा प्रकारात 34.54 मी. ची नोंद केली. चीनच्या तियान युझीनने 30.30 मी. ची नोंद करत रौप्यपदक मिळविले. स्विसच्या कॅथरेनी डेब्रुनेरने महिलांच्या टी-54 गटातील 5000 मी. धावण्याच्या शर्यतीत 12 मिनिटे आणि 18.29 सेकंदाचा अवधी घेत सुवर्णपदक पटकाविले. या क्रीडा प्रकारातील विद्यमान विजेती चीनची तियान येजुआनला डेब्रुनेरने मागे टाकले. तसेच तिने आपल्याच देशाच्या पॅट्रीसिया इचुसलाही बरेच मागे टाक सुवर्णपदकाला गवसणी घातली.