For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

दोन वर्षांत साकारणार 2500 कोटींच्या इमारती

06:55 AM Sep 23, 2025 IST | Tarun Bharat Portal
दोन वर्षांत साकारणार  2500 कोटींच्या इमारती
Advertisement

मंत्रिमंडळ बैठकीत विविध निर्णयांवर शिक्कामोर्तब

Advertisement

प्रतिनिधी/ पणजी

राज्य सरकारने केंद्रीय इमारत बांधकाम महामंडळ लिमिटेड (एनबीसीसी) यांच्यासमवेत सामंजस्य करार केला असल्याने आता राज्यातील सर्व सरकारी इमारत प्रकल्प सार्वजनिक व खासगी सहभाग (पीपीपी) तत्त्वावर येत्या दोन वर्षांत पूर्ण करण्यात येणार आहेत. या प्रकल्पांच्या प्रत्यक्ष कामाला येत्या 10 ते 15 दिवसांत सुरूवात करण्यात येणार असून दोन वर्षांत पूर्ण केले जातील. या सर्व प्रकल्पांना मंत्रिमंडळाची मान्यता घेण्यात आली असल्याची माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली. काल सोमवारी पर्वरी मंत्रालयात मंत्रिमंडळ बैठकीनंतर मुख्यमंत्री सावंत यांनी पत्रकारांना निर्णयांची माहिती दिली. यावेळी सार्वजनिक बांधकाममंत्री दिगंबर कामत उपस्थित होते.

Advertisement

मुख्यमंत्री सावंत म्हणाले, केंद्रीय इमारत बांधकाम महामंडळ लि., यांच्यासमवेत करार केल्यानुसार पणजीतील जुंता हाऊस, सर्किट हाऊस, सांतिनेज सरकारी क्वॉर्टर्स (प्लॉट1 आणि 2), सरकारी गॅरेज, याशिवाय वास्को येथील बसस्थानकांचा विकास करण्यात येणार आहे. त्याचबरोबर या महत्त्वाच्या प्रकल्पांबरोबर महत्त्वाकांक्षी असा नवा प्रशासन स्तंभ बांधण्यात येणार आहे. हे सर्व प्रकल्प सार्वजनिक व खासगी सहभाग (पीपीपी) तत्त्वावर पूर्ण करण्यात येणार आहेत.

तब्बल अडीच हजार कोटींचे प्रकल्प

प्रशासन स्तंभ आणि सर्किट हाऊस हा सरकारी प्रकल्प 100 टक्के पूर्णपणे सरकारी कामांसाठी वापरण्यात येणार आहे. जुंता हाऊस या इमारतीतील 30 टक्के जागा ही सरकारसाठी वापरात येणार आहे. तसेच सरकारी क्वॉर्टर्समध्ये सध्या असलेले सर्व सरकारी फ्लॅट सरकारला मिळणार आहेत. हे सर्व प्रकल्प 60 वर्षांसाठी केंद्रीय इमारत बांधकाम महामंडळ लिमिटेडकडे (एनबीसीसी) असतील. या सर्व प्रकल्पांसाठी  सुमारे अडीच हजार कोटी ऊपयांचा खर्च येणार आहे. हा खर्च सरकारच्या तिजोरीवर पडू नये, यासाठी पीपीपी तत्त्वाची निवड केली असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

जुनी वाहने ‘आरव्हीएसपी स्क्रॅप’ केंद्रात

सरकारने 15 वर्षांपूर्वीची जुनी वाहने फोंड्यातील ‘आरव्हीएसपी स्क्रॅप केंद्रात’ पाठविण्याचा निर्णय घेतला आहे. ह्यासाठी जुन्या वाहनांचे दर निश्चित करण्यात आले आहेत. ही जुनी वाहने लवकरात लवकर स्क्रॅप झाल्यास त्याचा राज्याला केंद्राच्यावतीने विशेष निधी मिळणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री सावंत यांनी दिली.

नार्वेत उभारणार अनाथालय

नार्वे येथे सरकारी जागेत ‘मदत ग्लोबल फाऊंडेशन’ यांना अनाथालय सुरू करण्यासाठी देण्यात येणार आहे. हे अनाथालय सुरू झाल्यानंतर राज्यातील अनेक मुलांना हक्काचे ठिकाण प्राप्त होणार आहे. शिवाय अनाथांच्या अनेक समस्या सुटण्यास मदत होणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

Advertisement
Tags :

.