मच्छे बायपास रस्त्यावर ओव्हरब्रिज निर्माण करा
देवस्थान पंचकमिटीची मागणी : शेतशिवार-ब्रम्हलिंग मंदिराकडे जाणारा रस्ता : राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणला निवेदन
वार्ताहर/किणये
हालगा-मच्छे बायपास रस्त्याचे कामकाज सुरू करण्यात आले आहे. मच्छे शिवारात हे कामकाज सध्या जोमाने सुरू आहे. मच्छे गावापासून एक किलोमीटर अंतरावर निसर्गरम्य अशा परिसरात गावची जागृत ब्रम्हलिंग देवस्थान आहे. तसेच या भागात गावातील शेतकऱ्यांच्या शेतजमिनी आहेत. गावातून या मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्यावरूनही मच्छे बायपास रस्ता गेला आहे. याचठिकाणी ओव्हरब्रिज बांधण्यात यावे, अशी मागणी देवस्थान पंचकमिटी व गावकऱ्यांच्यावतीने करण्यात आली आहे. ब्रम्हलिंग मंदिराकडे व शेतशिवाराकडे जाण्यासाठी भक्तांना व शेतकऱ्यांना हा एकच रस्ता आहे. या ठिकाणी जर ओव्हरब्रिज बांधले नाही तर या भागातील शेतकऱ्यांची व भक्तांची गैरसोय होणार आहे. यामुळे देवस्थान पंच कमिटीच्यावतीने मच्छेजवळील या बायपास रस्त्याच्या ठिकाणी ओव्हरब्रिज बांधण्याची मागणी करण्यात आली आहे.
धारवाड येथील राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण कार्यालयात जाऊन मच्छे गावातील देवस्थान पंच कमिटीच्या वतीने निवेदन देण्यात आले आहे. तसेच या बायपास रस्त्यावर ओव्हरब्रिज बांधणे गरजेचे आहे. तसेच या ओव्हरब्रिजचा शेतकऱ्यांना व मंदिराकडे जाणाऱ्या भक्तांना कशापद्धतीने उपयोग होणार आहे. याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना सविस्तर माहिती देऊन या पद्धतीने निवेदन देण्यात आले आहे. धारवाड कार्यालयातील अधिकाऱ्यांनी तुम्ही मच्छे नगरपंचायतीच्या माध्यमातून आपल्याला रितसर माहिती पाठवा. त्यानंतर वरिष्ठांशी बोलून आपण याबद्दल तोडगा काढण्याचा प्रयत्न करू, असे अधिकाऱ्यांनी आश्वासन देवस्थान पंचकमिटीला दिले, अशी माहिती देवस्थान पंचकमिटीचे अध्यक्ष चांगप्पा हावळ व उपाध्यक्ष सुरेश लाड यांनी दिली आहे.
बायपास रस्त्यासाठी अनेक शेतकऱ्यांच्या जमिनींचे भू संपादन
मच्छे गावातील महादेव गल्ली येथून ब्रम्हलिंग मंदिराकडे जाणारा रस्ता आहे. या रस्त्यावरूनच शेतकरी आपल्या शेत शिवारामध्ये जातात. मात्र याच ठिकाणावरून बायपास रस्ता गेला आहे. बायपास रस्त्याच्या पलिकडच्या बाजुला मच्छे ब्रम्हलिंग मंदिर व गावातील सुमारे 900 एकर शेतजमिनी आहेत. इथल्या नागरिकांचा शेती हाच मुख्य व्यवसाय आहे. या आधीच मच्छे गावातील शेतकऱ्यांच्या शेतजमिनी या बायपास रस्त्यासाठी संपादित करण्यात आल्या आहेत. त्यामुळे काही शेतकरी भूमिहीन झाले आहेत. ज्या शेतकऱ्यांच्या शेतजमिनी शिल्लक आहेत त्यांच्यासाठी व त्यांना आपल्या शेतशिवारात जाण्यासाठी या ठिकाणी ओव्हरब्रिज बांधण्याची गरज आहे. यावेळी नागेश गुंडोळकर, निंगाप्पा नावगेकर, बसवंत नावगेकर, शंकर बेळगावकर, शंकर उसुलकर, भोमाणी लाड, संजय सुळगेकर, असद हुजदार, बाळू नावगेकर, कृष्णा अनगोळकर, लक्ष्मण कणबरकर, दुधप्पा कणबरकर, विजय कलखांबकर आदांसह पंचकमिटीचे सदस्य, ग्रामस्थ उपस्थित होते.
नोडल अधिकाऱ्यांकडून पाहणी
देवस्थान पंचकमिटीच्यावतीने बुधवारी सकाळी मच्छे नगरपंचायतीच्या कार्यालयात जाऊन ओव्हर ब्रिजसंदर्भात निवेदन दिले. तसेच ज्या ठिकाणी ओव्हरब्रिज व्हायला पाहिजे, त्या परिसराची पाहणी करण्याची विनंती नोडल अधिकारी तुकाराम जमखंडी यांच्याकडे केली. देवस्थान पंचकमिटीच्या या मागणीचा विचार करून नोडल अधिकाऱ्यांनी बुधवारी सदर परिसराची पाहणी केली आहे.