शहर परिसर-ग्रामीण भागात रंगली म्हशी पळविणे मिरवणूक
बेळगाव : शेकडो वर्षांच्या परंपरेनुसार दिवाळी पाडव्यानिमित्त बुधवार दि. 22 रोजी बेळगाव शहर, शहापूर, वडगाव, नानावाडी, टिळकवाडी, त्याचबरोबर ग्रामीण भागात म्हशींची मिरवणूक काढण्यात आली. हलगीचा कडकडाट व दुचाकींचे सायलेन्सर काढून चालवत पाठीमागून म्हशींना पळविण्यात आले. काही ठिकाणी स्थानिक वादकांसह कोल्हापूर येथील हलगी वाद्यपथके मिरवणुकीत सहभागी झाली होती. शहरात विविध ठिकाणी त्याचबरोबर शहापूर, वडगाव, टिळकवाडी व ग्रामीण भागात म्हशींना एकत्र आणून जल्लोषात मिरवणूक काढण्यात आली. म्हशींच्या शिंगांना आकर्षकरीत्या रंगविण्यात आले होते. गळ्यात साखळ्या, रिबन, गोंडे घालण्यात आले होते. गवळी गल्ली, गोंधळी गल्ली, चव्हाट गल्ली, कोनवाळ गल्ली, वडगाव पाटील गल्ली, रयत गल्ली शहापूर, नानावाडी यासह ग्रामीण भागात विविध ठिकाणी म्हशी पळविण्यात आल्या. काही ठिकाणी दूध घेणाऱ्या ग्राहकांनी दुभत्या म्हशींच्या मालकांना भेटवस्तू देऊन सन्मान केला. म्हशी पळवत असताना काही जण जखमी होण्याच्या घटनाही घडल्या.