महामार्गात खोदलेल्या चरीत पडून रेडकू जखमी
शेतकऱ्याचे पन्नास हजाराचे नुकसान
गुंजी : गुंजी येथे सुरु असलेल्या बेळगाव-गोवा महामार्गाच्या कामासाठी खोदलेल्या चरीमध्ये म्हशीचे रेडकू पडून ते कमरेतून मोडल्याने गंभीररीत्या जखमी झाल्याची घटना मंगळवारी सायंकाळी घडली. नेहमीप्रमाणे सदर वाटेवरून दिनेश देसाई यांच्या म्हशी जात असताना महामार्गासाठी खोदण्यात आलेल्या चारीमध्ये तीन वर्षाचे म्हशीचे रेडकू पडले. त्यामुळे त्या रेडीला जाग्यावरून उठणेही अशक्य झाले. कणाच मोडला असल्याने त्यावर उपचार होणेही मुश्किल असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. त्यामुळे दिनेश देसाई यांचे 40 ते 50 हजाराचे नुकसान झाले आहे. या नुकसानीला कंत्राटदाराचा बेजबाबदारपणाच कारणीभूत असल्याने नागरिकांतून संताप व्यक्त होत आहे. वास्तविक ज्या ठिकाणी काम सुरू आहे त्या ठिकाणाहून गुंजीतील नागरिक पलीकडे असलेल्या विहिरीचे पाणी आणण्यासाठी सतत ये-जा करतात. त्याचबरोबर जनावरेही नेहमी ये-जा करतात त्याकरिता त्या ठिकाणी सर्विस रस्ता देऊन खोदलेल्या चरीच्या बाजूने धोका होऊ नये यासाठी योग्य उपाययोजना करणे गरजेचे होते.