दिल्लीत उद्यापासून बौद्ध शिखर परिषद
दोन दिवस चालणार कार्यक्रम : बौद्ध समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी मोदी सरकार सक्रीय
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
भारत सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालय आणि आंतरराष्ट्रीय बुद्धिस्ट कॉन्फेडरेशनच्या (आयबीसी) सहकार्याने 5 आणि 6 नोव्हेंबर 2024 रोजी नवी दिल्ली येथे पहिली आशियाई बौद्ध शिखर परिषद आयोजित करण्यात आली आहे. या शिखर परिषदेची थीम ‘आशिया मजबूत करण्यात बौद्ध धर्माची भूमिका’ अशी आहे. या कार्यक्रमाला देशाचे राष्ट्रपती प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहतील अशी अपेक्षा आहे.
बौद्ध समुदायाला भेडसावणाऱ्या समकालीन आव्हानांना तोंड देण्यासाठी आणि संवाद वाढवण्यासाठी या शिखर परिषदेत संपूर्ण आशियातील विविध बौद्ध परंपरांमधील संघ नेते, विद्वान, तज्ञ आणि अभ्यासक एकत्र येतील. ही शिखर परिषद भारताच्या ‘अॅक्ट ईस्ट पॉलिसी’ची अभिव्यक्ती असून ती धम्मासह आशियातील सामूहिक, सर्वसमावेशक आणि आध्यात्मिक विकासावर आधारित आहे.
भारताच्या आणि संपूर्ण आशियाच्या आध्यात्मिक आणि सांस्कृतिक इतिहासात बौद्ध धर्माला अनन्यसाधारण स्थान आहे. बुद्ध, त्यांचे शिष्य आणि उपदेशक यांच्या शिकवणींनी आशियाला जीवन, देवत्व आणि सामाजिक मूल्यांबद्दलच्या समान दृष्टिकोनातून एकत्र केले. भारताच्या संस्कृतीत बौद्ध धर्म हा एक मौल्यवान घटक असल्याने देशाचे मजबूत परराष्ट्र धोरण आणि प्रभावी राजनैतिक संबंध विकसित करण्यात मदत केली आहे.
संपूर्ण आशियातील बौद्ध धर्माच्या विविध अभिव्यक्तींना एकत्र आणण्याची ही शिखर परिषद एक अनोखी संधी आहे. संवादाद्वारे समकालीन आव्हानांवर चर्चा करणे आणि बौद्ध वारशाचा प्रचार करण्यावर संमेलनात संवाद घडविण्यात येतील. या शिखर परिषदेचे उद्दिष्ट अधिक उदार, शाश्वत आणि शांततापूर्ण जगामध्ये योगदान देण्याचे आहे.