For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

बसप स्वबळावर लढविणार निवडणूक

06:22 AM Jan 16, 2024 IST | Tarun Bharat Portal
बसप स्वबळावर लढविणार निवडणूक
Advertisement

इंडिया आघाडीला नकार : अखिलेश यांना सरड्याची उपमा : मायावतींकडून कार्यकर्त्यांना संदेश

Advertisement

वृत्तसंस्था/ लखनौ

बसप प्रमुख मायावती यांनी सोमवारी स्वत:चा 68 वा जन्मदिन साजरा केला आहे. यानिमित्त पत्रकार परिषद आयोजित करत मायावती यांनी भाजप, काँग्रेस आणि समाजवादी पक्षावर निशाणा साधला आहे. याचबरोबर त्यांनी बसप स्वबळावर लोकसभा निवडणूक लढविणार असल्याची घोषणा करत इंडिया आघाडीत सामील होण्यास नकार दिला आहे. बसप आता पूर्ण शक्तिनिशी निवडणूक लढविणार असून ‘फ्री’मध्ये कुणालाच समर्थन देणार नसल्याची भूमिका मायावती यांनी मांडली आहे.

Advertisement

पक्षाशी जोडले गेलेले लोक 15 जानेवारी रोजी माझा जन्मदिन हा ‘जन कल्याणकारी दिवस’ म्हणून साजरा करतात. उत्तरप्रदेशात आमचे 4 वेळा सरकार राहिले असून यादरम्यान आम्ही दलित, मुस्लीम आणि गरीबांसमवेत समाजाच्या सर्व वर्गांच्या कल्याणासाठी काम केले. आमच्या सरकारकडून राबविण्यात आलेल्या योजनांची नक्कल अन्य पक्षांची सरकारे करत असल्याचा दावा मायावती यांनी यावेळी केला आहे.

सप प्रमुख अखिलेश यादव यांनी इंडिया आघाडीच्या संबंध बसपची दिशाभूल करण्यासाठी सरड्याप्रमाणे बसपप्रमुख विषयीची स्वत:ची भूमिका बदलली आहे हे पक्ष कार्यकर्त्यांनी जाणून घेण्याची गरज आहे. अखिलेश यांनी इंडिया आघाडीतून बाहेर पडणार असल्याचे यापूर्वी म्हटले होते. काँग्रेस, भाजप आणि त्यांचे सर्व सहकारी पक्षांची विचारसरणी ही भांडवलशाही अन् सांप्रदायिक आहे. हे पक्ष दलित आणि अतिमागासांना स्वत:च्या  पायांवर उभे राहताना पाहू शकत नाहीत, असे वक्तव्य मायावती यांनी केले आहे.

इंडिया आघाडीला नकार

बसप लोकसभा निवडणुकीत कुणाशीही आघाडी करणार नाही. परंतु निवडणुकीनंतर आघाडी करण्याचा पर्याय आमच्यासमोर आहे. आमच्या पक्षाचे नेतृत्व दलित हातांमध्ये आहे. आमची मते सहकारी पक्षाला मिळतात, परंतु इतर जातींची मते बसपला मिळत नाहीत. याचे उदाहरण म्हणजे मागील निवडणूक आहे. तर बसपने स्वबळावर निवडणूक लढवून उत्तरप्रदेशात पूर्ण बहुमताचे सरकार यापूर्वी स्थापन केले असल्याचे मायावती म्हणाल्या.

अयोध्येबाबत अद्याप निर्णय नाही

अयोध्येतील राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे निमंत्रण मला मिळाले आहे. परंतु अन्य कामात व्यग्र असल्याने मी अद्याप कुठलाच निर्णय घेतलेला नाही. आम्ही 22 जानेवारी रोजी होणाऱ्या कार्यक्रमाचे स्वागत करतो. आम्ही देखील बाबरी मशिदीवरून भविष्यात होणाऱ्या कुठल्याही कार्यक्रमाचे स्वागत करू. सर्व  धर्म समान असल्या विचारावर आमचा विश्वास असल्याचे मायावती यांनी म्हटले आहे.

राजकारणातून संन्यास नाही

अलिकडेच आकाश आनंदला स्वत:चा राजकीय उत्तराधिकारी घोषित केले आहे. या घोषणेपासून प्रसारमाध्यमांमध्ये मी राजकारणातून संन्यास घेणार असल्याचे वृत्त दिले जात आहे. परंतु मी राजकारणात कायम राहणार असल्याचे स्पष्ट करू इच्छिते. पक्षाला मजबूत करण्यासाठी मी काम करणार असल्याचे त्यांनी नमूद केले आहे.

मोफत धान्य योजना, गुलामीचे टूल

सध्याचे सरकार रोजगार देण्याऐवजी मोफत धान्य देऊन लोकांना स्वत:चे गुलाम करू पाहत आहे. बसपचे सरकार असताना लोकांना शासकीय आणि खासगी क्षेत्रात रोजगाराची साधने मिळवून दिली हाती. परंतु हे भाजप सरकार लोकांना गरीबी आणि बेरोजगारीपासून मुक्ती मिळवून देण्याऐवजी मोफत धान्य पुरवून गुलाम करण्याचा प्रयत्न करत आहे. केंद्र आणि राज्य सरकार धर्म आणि संस्कृतीच्या नावाखाली राजकारण करत असल्याने लोकशाही कमकुवत होत असल्याचा आरोप मायावती यांनी केला आहे.

Advertisement
Tags :

.