बसप नेत्याच्या हत्येचे तीव्र पडसाद
वृत्तसंस्था / चेन्नई
बहुजन समाज पक्षाच्या तामिळनाडू राज्य शाखेचे अध्यक्ष के. आर्मस्ट्राँग यांच्या हत्येमुळे तामिळनाडूत तणावाचे वातावरण आहे. बहुजन समाज पक्षाच्या कार्यकर्त्यांनी शनिवारी राज्यात अनेक ठिकाणी रास्तारोको कार्यक्रमांचे आयोजन केले होते. या हत्येची चौकशी सीबीआयकडून केली जावी, अशी मागणी आंदोलकांकडून करण्यात येत आहे. तामिळनाडू पोलिसांनी या प्रकरणी आतापर्यंत 8 जणांना अटक केली आहे. मात्र, अटक केलेले आरोपीच खरे गुन्हेगार आहेत काय, यासंबंधी आर्मस्ट्राँग यांच्या नातेवाईकांनी संशय व्यक्त केला आहे.
आर्मस्ट्राँग यांची हत्या त्यांच्या पेराम्बूर येथील घराजवळ सहा जणांच्या टोळीकडून करण्यात आली होती. हल्लेखोर बाईक्सवरुन आले होते. त्यांचा शोध अद्याप लागलेला नाही. ही हत्या एका सुनियोजित कटाचा भाग आहे, असा आरोप बहुजन समाज पक्षाने केला आहे. या पक्षाच्या नेत्या मायावती लवकरच तामिळनाडूला भेट देणार आहेत, अशी माहिती पक्षाकडून देण्यात आली आहे.
रुग्णालयाबाहेर निदर्शने
आर्मस्ट्राँग यांच्या हत्येनंतर त्यांचे शवविच्छेदन जिल्हा रुग्णालयात करण्यात आले. त्यावेळी बसपच्या कार्यकर्त्यांनी रुग्णालयाबाहेर निदर्शने केली. खऱ्या गुन्हेगारांना शोधा अशा घोषणा त्यांनी दिल्या. तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांनी या हत्येसंदर्भात तीव्र शोक व्यक्त केला असून गुन्हेगारांना शोधून काढले जाईल, असे आश्वासन दिले आहे. बसप कार्यकर्त्यांच्या निदर्शनांमुळे राजधानी चेन्नई येथे अनेक ठिकाणी वाहतूक कोंडीही झाली होती.
कारणे अज्ञातच
आर्मस्ट्राँग यांची हत्या का करण्यात आली याचे उत्तर अद्याप सापडलेले नाही. हा खून पैशाच्या वादातून झाला असावा, अशी शक्यता काही जणांनी व्यक्त केली होती. तथापि, ही राजकीय हत्याच असल्याचा दावा बसपकडून केला जात आहे. व्हीसीके या पक्षाचे नेते आणि लोकसभेचे खासदार थोल थिरुमावलवन यांनी राज्य सरकारवर निरपराध लोकांना अटक केल्याचा आरोप केला आहे. पोलिसांनी लोकांची दिशाभूल करण्यासाठी, ज्यांचा या हत्येशी काहीही संबंध नाही, त्यांना गोवल्याचे त्यांचे म्हणणे आहे. राज्य सरकारने या प्रकरणी त्वरित चौकशी करण्याचे आश्वासन दिले असून दोषींना सोडणार नसल्याचे स्पष्ट केले आहे.