हुळंद येथील बीएसएनएल टॉवर केवळ शोभेची वस्तू
तांत्रिक बिघाडामुळे नेहमी बंदच : ग्राहकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय
वार्ताहर/कणकुंबी
तालुक्याच्या पश्चिम भागात मोबाईल फोन सेवा कधी येणार असे असताना हुळंद आणि परिसरातील चिगुळे, बेटणे, तळावडे, पारवाड, मान आदी गावांत बीएसएनएल मोबाईल टॉवर उभारण्यात आले. परंतु हुळंद येथील बीएसएनएलचा मोबाईल टॉवर म्हणजे ‘असून अडचण आणि नसून खोळंबा’ असंच म्हणावं लागेल. बीएसएनएलच्या सेवेबद्दल जांबोटी, कणकुंबी भागात तीव्र नाराजी आहे. बीएसएनएल मोबाईल टॉवर म्हणजे शोभेचीच वस्तू अशी परिस्थिती कणकुंबी भागात निर्माण झाली आहे. कारण जांबोटी व कणकुंबी येथे सुरुवातीला बीएसएनएलचे टॉवर उभारण्यात आले होते. अशाच पद्धतीने हुळंद गावात बीएसएनएलने टॉवर उभारण्यात आल्यानंतर गावातील सर्व नागरिकांनी बीएसएनएलचे सीमकार्ड घेतले. सुरूवातीला काही दिवस चांगली सेवा देण्यात आली. मात्र नंतर बीएसएनएलचे नेटवर्क पूर्णपणे कोलमडले. जीओचे नेटवर्क काही ठिकाणी येत होते. नागरिकांनी बीएसएनएल नेटवर्क सुरू झाल्यावर जीओचे कार्ड बंद केले होते. त्यामुळे नागरिकांना मोठ्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे.
उत्तम सेवा देण्यात अपयशी
ग्राहकांना उत्तम प्रकारे सेवा देण्यात बीएसएनएल अपयशी ठरत आहे. त्यामुळे शेवटी ग्राहक वर्ग कंटाळून अन्य मोबाईल कंपनीकडे धाव घेत आहे. ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी की सरकारी आदेशाप्रमाणे प्रत्येक खेड्यात टॉवर उभारण्याचे नाटक केले जात आहे का? अशी शंका आणि प्रश्न नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे. प. भागात बीएसएनएलचा टॉवर झाला तर एकमेकांना संपर्क साधता येतो. जगाशी संपर्क साधता येईल यासाठी जय जवान जय किसानच्या या संघटनेच्या माध्यमातून गोविंद पाटील व कार्यकर्त्यांनी वरिष्ठ पातळीवर पाठपुरावा केला होता. याची दखल घेऊन शासनाने टॉवर उभारणीचे काम जोमाने सुरू केले आहे.
संपर्क साधण्यासाठी घ्यावा लागतोय टेकडी किंवा झाडाचा आधार
सद्यस्थितीत चिगुळे, पारवाड, चिखले, बेटणे, चोर्ला, मान, हुळंद, तळावडे आदी गावांमध्ये मोबाईल नेटवर्क सेवा उपलब्ध नसल्याने नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. येथे सरकारी नोकर, किंवा निमसरकारी कर्मचारी यांना एखाद्या कामासाठी संपर्क साधायचा झाला किंवा मेसेज पाठवायचा असेल तर उंच टेकडीवर किंवा झाडावर चढून नेटवर्क शोधावे लागते. अशा बिकट परिस्थितीत कोणता का असेना पण मोबाइल टॉवर उभारला तर नागरिकांना थोडातरी आधार मिळू शकतो. परंतु अखेर बीएसएनएल टॉवर उभारणीमुळे नागरिकांना मात्र आशेचा किरण दिसू लागला आहे.