‘बीएसएनएल’ची 4-जी सेवा लवकरच सुरु
आगामी चार महिन्यात 20 हजार बेस ट्रान्सीव्हर स्टेशनची होणार स्थापना : एमडी प्रवीण कुमार पुरवार
नवी दिल्ली :
बीएसएनएल पुढील तीन ते चार महिन्यांत किंवा 20 हजार बेस ट्रान्सीव्हर स्टेशन (बीटीएस) स्थापित केल्यानंतर 4 जी सेवा सुरू करणार आहे. बीटीएस हे कोणत्याही मोबाईल नेटवर्कमध्ये एक स्थिर रेडिओ ट्रान्सीव्हर आहे. त्याला टॉवर असेही म्हणतात, असे भारत संचार निगम लिमिटेड (बीएसएनएल) चे मुख्य व्यवस्थापकीय संचालक प्रवीण कुमार पुरवार यांनी सांगितले आहे.
उद्योग परिषदेला उपस्थित राहण्यासाठी आलेल्या पुरवार म्हणाले की, सरकारी दूरसंचार कंपनीने उत्तर भारतातील हरियाणा, पंजाब, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड आणि पश्चिम उत्तर प्रदेश या पाच मंडळांमध्ये यापूर्वीच 3 हजार बीटीएस बसवले आहेत. ते म्हणाले, ‘आम्ही अधिकृतपणे लॉन्च करण्यापूर्वी दररोज शंभर साइट्स सुरू करण्याच्या दिशेने काम करत आहोत.’
दूरसंचार विभागाच्या इतर अधिकाऱ्यांनी यापूर्वी सांगितले होते की, उत्तरेकडील राज्यांनंतर, टेल्कोने आंध्रप्रदेश, तेलंगणा आणि तामिळनाडू या दक्षिणेकडील राज्यांची निवड केली आहे जिथे 4 जी सेवा प्रथम सुरू केली जाईल. कंपनीने टॉवर उभारण्यासाठी या राज्यांतील मोठ्या भागांची निवड केली आहे. यामध्ये आंध्र प्रदेश आणि तेलंगणामधील 4,200 हून अधिक 4 जी साइट्सचा समावेश आहे. तीन खासगी दूरसंचार कंपन्या रिलायन्स जिओ, भारती एअरटेल आणि वोडाफोन आयडिया यांनी 4 जी सेवा सुरू केल्यानंतर अनेक वर्षांनी बीएसएनएलच्या योजनांना वारंवार विलंब होत आहे.