जम्मू-काश्मीरमध्ये बीएसएफचा जवान बेपत्ता
जवानाचा लागला नाही सुगावा : शोधमोहीम सुरूच
वृत्तसंस्था/ श्रीनगर
जम्मू-काश्मीरच्या श्रीनगरमध्ये तैनात बीएसएफचा जवान बेपत्ता झाला आहे, ज्यानंतर सुरक्षा दलांनी परिसरात व्यापक शोधमोहीम हाती घेतली आहे. 60 व्या बटालियनच्या बीएसएफच्या ‘सी’ कंपनीत कार्यरत कॉन्स्टेबल सुगम चौधरी गुरुवारी संध्याकाळी सुमारे 5 वाजल्यापासून पंथाचौक येथील बटालियन मुख्यालयात सुटी न घेता अनुपस्थित राहिला होता.
पंथाचौक बस स्थानक, टॅक्सी स्टँड आणि श्रीनगर रेल्वेस्थानकासमवेत आसपासच्या भागांमध्ये विशेष स्वरुपात नियुक्त बीएसएफ पथकांकडून शोध घेतल्यावरही बेपत्ता जवानाचा सुगावा लागला नाही. औपचारिक प्रक्रियेच्या अंतर्गत पंथा चौक पोलीस स्थानकात बेपत्ता असल्याची तक्रार नोंदविण्यात आल्याचे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. सुगम चौधरी हा उत्तरप्रदेशच्या बुलंदशहर जिल्ह्यातील सिखेरा गावचा रहिवासी आहे. त्याच्या परिवारालाही स्थितीबद्दल कळविण्यात आले आहे. बेपत्ता जवानाचा शोध घेण्यासाठी अंतर्गत चौकशी आणि पोलिसांची चौकशी जारी आहे.