झोपेत असलेल्या चौघांची गदगमध्ये निर्घृण हत्या
नगराध्यक्षांच्या मुलासह एकाच कुटुंबातील तिघांचा समावेश
प्रतिनिधी/ बेंगळूर
गदग-बेटगेरी नगरपालिकेच्या नगराध्यक्षा सुनंदा बाकळे यांच्या मुलासह चौघांची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. गदगमधील दासर गल्ली येथे शुक्रवारी पहाटे ही घटना घडली आहे. या घटनेमुळे गदगमधील जनतेत भीतीचे वातावरण पसरले आहे.
गदग-बेटगेरी नगरपालिकेच्या नगराध्यक्षा सुनंदा बाकळे यांचा मुलगा कार्तिक बाकळे (वय 27), परशुराम हादिमनी (वय 55), त्यांची पत्नी लक्ष्मी (वय 45) आणि मुलगी आकांक्षा (वय 16) यांची अज्ञातांनी हत्या केली आहे. हत्येनंतर फरार झालेल्या मारेकऱ्यांचा शोध घेण्यासाठी पोलिसांची चार विशेष पथके नेमण्यात आली आहेत.
17 एप्रिल रोजी लक्ष्मेश्वर येथील कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी तिघे नातेवाईक आले होते. 18 रोजी कोप्पळला जाण्यासाठी तयार झाले. मात्र, रेल्वे चुकल्याने ते सुनंदा यांच्या दासर गल्ली येथील घरीच वास्तव्यास राहिले. कार्तिक आणि परशुराम हे पहिल्या मजल्यावरील खोलीत झोपी गेले तर लक्ष्मी आणि आकांक्षा या ग्राऊंड फ्लोअरवरील खोलीत झोपी गेल्या. त्यांनी खोलीचा दरवाजा आतून बंद केला नव्हता. आरोपींनी घराच्या मागील बाजूने आत प्रवेश करून त्यांची हत्या केली. दुसऱ्या खोलीत असलेल्या प्रकाश बाकळे व सुनंदा बाकळे यांचा खेलीचा दरवाजा आतून बंद असल्याने आरोपींनी दरवाजा फोडण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे संशय आल्याने प्रकाश यांनी पोलिसांना फोन लावला. पोलिसांना फोन करताच आरोपींनी पलायन केले.
पहाटे 3 ते 4 च्या सुमारास ही घटना घडल्याचे सांगण्यात येते. परशुराम, लक्ष्मी आणि आकांक्षा हे मूळचे कोप्पळ येथील आहेत. परशुराम हे हॉटेल व्यावसायिक होते.
सीसीटीव्ही फुटेज तपासून आरोपी घरात कसे शिरले, कोठून आले, ही माहिती मिळविली जात असल्याचे गदग जिल्हा पोलीसप्रमुख बी. एस. न्यामगौड यांनी दिली आहे. घटनास्थळी श्वानपथक, ठसेतज्ञांना पाचारण करण्यात आले. घरी दरोड्यासाठी आलेल्यांनी हे कृत्य केल्याचा संशय असला तर पोलिसांनी सर्व दिशेने तपास सुरू केला आहे.