For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

तरुण पत्रकाराच्या हत्येने समाजमन सुन्न ; पत्रकार मुकेश चंद्राकरची निर्घृण हत्या

03:34 PM Jan 04, 2025 IST | अनुजा कुडतरकर
तरुण पत्रकाराच्या हत्येने समाजमन सुन्न   पत्रकार मुकेश चंद्राकरची निर्घृण हत्या
Advertisement

गडचिरोली : छत्तीसगडमधील बस्तर विभागातील बिजापूर येथील तरुण पत्रकार मुकेश चंद्राकरच्या निर्घृण हत्येने देशात खळबळ उडाली आहे. ‘बस्तर जंक्शन’ नावाने युट्युब चॅनेलच्या माध्यमातून नक्षल प्रभावित भागात पत्रकारिता करणाऱ्या मुकेशचे देशभर फॉलोवर्स होते. मुकेश दोन दिवसांपासून बेपत्ता होता. ३ जानेवारीला बिजापूर चट्टानपारा येथील एका कंत्राटदार काँग्रेस नेत्याच्या घरामागील सांडपाण्याच्या टाकीत त्याचा मृतदेह आढळून आला.

Advertisement

काही महिन्यांपूर्वी बस्तरमध्ये नक्षलवाद्यांनी एका जवानाचे अपहरण केले होते. त्यावेळी पत्रकारांच्या मध्यस्थीने जवानाची सुटका करण्यात आली. या पत्रकारांमध्ये मुकेश चंद्राकर हा तरुण पत्रकार अग्रणी होता. अत्यंत हालाखीच्या परिस्थितीत शिक्षण घेऊन पत्रकारितेकडे वळलेल्या मुकेशने अल्पावधीतच आपली एक वेगळी ओळख निर्माण केली होती. त्याचे ‘बस्तर जंक्शन’ हे यूट्यूब चॅनल देशभर प्रसिद्ध होते . बस्तरमधील नक्षलवाद आदिवासींच्या समस्या त्याने हिरिरीने जगापुढे आणल्या. परंतु रस्ता बांधकामातील भ्रष्टाचार उघड करणे त्याच्या जीवावर बेतले. काही दिवसांपूर्वी त्याने बिजापूरच्या दुर्गम भागातील रस्ता बांधकामात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होत असल्याची बातमी केली होती. त्यानंतर रस्त्याच्या कंत्राटदार आणि मुकेशमध्ये वाद झाला होता. हा कंत्राटदार काँग्रेसच नेता आहे. एक जानेवारीला या कंत्राटदाराच्या भावाने मुकेशला घरून काही कामासाठी नेले होते. तेव्हापासून तो बेपत्ता होता. ३ जानेवारीला दुपारच्या सुमारास बिजापूर चट्टानपारा येथे सदर कंत्राटदाराच्या घरामागील सांडपाण्याच्या टाकीत हात पाय बांधलेल्या अवस्थेत मुकेशचा मृतदेह आढळून आला. यामुळे केवळ छत्तीसगडमध्येच नव्हे तर देशभर खळबळ उडाली आहे. एका होतकरू तरुण पत्रकाराची अशाप्रकारे हत्या झाल्याने समाजमन सुन्न झाले आहे. या घटनेनंतर छत्तीसगडचे मुख्यमंत्री विष्णुदेव साय यांनी ‘एक्स’वर मुकेशला श्रद्धांजली अर्पण करीत दोशींना तत्काळ अटक करण्यात येईल असे आश्वासन दिले आहे. तर आज बस्तरमध्ये या हत्येविरोधात बंद पाळण्यात येत आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.