एकाच कुटूंबातील चौघांचा खून करणाऱ्या सांगलीतील युवकाला कुडचीत अटक
मूळचा सांगलीचा; नातेवाईकांच्या घरी होता लपून
बेळगाव प्रतिनिधी
उडुपी येथील एकाच कुटुंबातील चौघांचा निर्घृण खून करण्यात आला होता. या प्रकरणी उडुपी पोलिसांनी तपास करून काही जणांना अटक केली. या प्रकरणातील एक संशयित कुडची (ता. रायबाग) येथील आपल्या नातेवाईकांच्या घरी लपून बसला होता. त्याला उडुपी पोलिसांनी अटक केली आहे. सदर तरुण हा मूळचा सांगलीचा असल्याचे पोलिसांनी सांगितले.
प्रवीण अरुण चौगुले (वय 35 मूळगाव सांगली, सध्या रा. कुडची) असे अटक केलेल्या तरुणाचे नाव आहे. उडुपी येथील एका महिलेचा आणि तीन मुलांचा खून करून हे संशयित फरार झाले होते. मास्क परिधान करून त्यांनी हे खून केले होते. या घटनेनंतर एकच खळबळ उडाली होती.
कुडची (ता. रायबाग, जि. बेळगाव) येथील आपल्या नातेवाईकांच्या घरी संशयिताने आसरा घेतल्याची माहिती उडुपी पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिसांनी सापळा रचून मोबाईल लोकेशनच्या आधारे त्याचा शोध घेत ताब्यात घेतले. स्थानिक पोलिसांच्या मदतीने प्रवीणला ताब्यात घेतले असून अधिक चौकशीसाठी उडुपी येथे नेण्यात आले आहे.
उडुपीतील नेजारुजवळील तृप्तीनगरमध्ये ही घटना घडली होती. या घटनेत हसिना (वय 46), अफनान (वय 23), अयनाज (वय 21) आणि असीम (वय 12) यांचा त्यांनी खून केला होता. या घटनेनंतर उडुपी परिसरात खळबळ उडाली होती. पोलिसांनी मास्क परिधान केलेल्या संशयितांचा तपास सुरू केला आहे. या प्रकरणी काही जणांना ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली आहे.