Karad : जखिणवाडी यात्रेत वादातून युवकाचा निघृण खून
दोन गटातील खुन्नस, युवकाची हत्या
कराड : जखिणवाडी, ता. कराड येथील यात्रेत झालेल्या मारामारीच्या घटनेतून युवकांच्या दोन गटात खुन्नस कायम होती. याचे पर्यवसन शनिवारी सायंकाळी एका युवकाच्या निघृण खुनात झाले. दोघा युवकांनी कोयत्याने हल्ला करत प्रविण सुभाष बोडरे (रा. जखिणबाडी ता. कराड) याचा खून केला. नांदलापूरच्या हद्दीतील मारूती मंदीर परिसरात घडलेल्या या घटनेने प्रचंड खळबळ उडाली असून खुनाच्या घटनेने दोन गटांतील संघर्ष वाढीस लागण्याची भिती ग्रामस्थांनी व्यक्त केली.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, कराड तालुक्यातील जखिणवाडी हे नावाजलेले गाव असून गावची यात्रा मोठी असते. नुकत्याच झालेल्या यात्रेत खुन्नस देण्यावरून दोन गटात तुंबळ मारामारी झाली होती. यातही दोन्ही गटातील युवक जखमी होऊन कराड पोलिसांत दोन्ही बाजुकडून परस्पर फिर्यादी दाखल झाल्या होत्या.
यात्रेतील मारामारी पण खुन्नस कायम
जखिणवाडी यात्रेत झालेल्या वादाचे पडसाद कायम होते. शनिवारी, २५ ऑक्टोबर रोजी सायंकाळी पाळत ठेवून हा हल्ला केला असावा असा अंदाज पोलिसांनी वर्तवला मृत प्रविण बोडरे याच्यावर दोघा युवकांनी कोयत्याने हल्ला केला. सपासप वार केल्याने बोडरे रक्ताच्या थारोळ्यात कोसळला. नांदलापूर, ता. कराड येथील मारुती मंदिर परिसरात हा थरार घडला. बोडरेवर हल्ला करून हल्लेखोर पसार झाले. हा घडलेला सर्व प्रकार ग्रामस्थांनी पोलिसांना कळवला. पोलीस उपअधिक्षक राजश्री पाटील, वरिष्ठ पोलीस निरिक्षक राजू ताशिलदार, अशोक मापकर, सज्जन जगताप, संग्राम पाटील, दिग्विजय सांडगे, आनंदा जाधव, मुकेश मोरे यांच्यासह पोलीस घटनास्थळी दाखल झाले.
तणाव कायम...
धरपकड सुरू हल्ला झालेल्या प्रविण बोडरे याला तातडीने कराडच्या कृष्णा रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. प्रविणचा खून झाल्याचे समजताच घटनास्थळी व कृष्णा रुग्णालयात नातेवाईकांसह मित्रपरिवाराने प्रचंड गर्दी केली होती. तणावपूर्ण वातावरण लक्षात घेता पोलिसांनी जखिणवाडीत बंदोबस्तासह गस्त वाढवली होती. चौकाचौकात या घटनेची चर्चा होती. हल्लेखोरांच्या शोधासाठी पोलिसांनी छापासत्र सुरू केले होते. रात्री उशीरापर्यंत पोलीस शोध घेत होते.