बेंगळुरात महिला अधिकाऱ्याची निर्घृण हत्या
कारण अस्पष्ट : खाण व्यवसायातील वादातून हत्या झाल्याचा संशय
प्रतिनिधी/ बेंगळूर
बेंगळूरमध्ये 37 वर्षीय महिला अधिकाऱ्याची चाकूने गळा चिरून निर्घृण हत्या करण्यात आली आहे. या घटनेमुळे शहरात खळबळ माजली असून मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. प्रतिमा असे या अधिकाऱ्याचे नाव असून त्या बेंगळूर ग्रामीण जिल्ह्यात खाण आणि भूविज्ञान खात्यात उपसंचालिका म्हणून सेवा बजावत होत्या.
बेंगळूरच्या सुब्रह्मण्यपूर पोलीसस्थानक हद्दीतील गोकुळ अपार्टमेंटमध्ये प्रतिमा या भाडोत्री फ्लॅट घेऊन एकट्याच वास्तव्यास होत्या. त्यांचे पती सत्यनारायण आणि मुलगा चिराग हे शिमोगा जिल्ह्यातील तीर्थहळ्ळी येथे वास्तव्यास आहेत. दरम्यान, शनिवारी रात्री मारेकऱ्यांची त्यांची चाकूने गळा चिरून हत्या केली. हत्येनंतर मारेकरी फरार झाले. सदर घटनेविषयी अनेक शंकाकुशंकांना ऊत आला आहे. खाण व्यवसायाशी संबंधित वादावरून प्रतिमा यांची हत्या झाल्याचा संशय व्यक्त होत आहे. त्यामुळे पोलिसांनी तपासाची चक्रे गतिमान केली आहेत.
कार्यालयातील काम संपल्यानंतर शनिवारी रात्री 8:30 वाजता कारचालकाने प्रतिमा यांना फ्लॅटवर सोडले होते. रात्री त्यांचा भाऊ प्रतीश यांनी फोन केला. पण तो त्यांनी उचलला नाही. रविवारी सकाळीही त्यांनी पुन्हा फोन केला. त्यामुळे भयभीत झालेल्या प्रतीश यांनी सकाळी फ्लॅटला भेट दिली असता प्रतिमा रक्ताच्या थारोळ्यात गतप्राण झाल्याचे दिसून आले. घरातील कोणत्याही वस्तूंची चोरी झाली नसल्याने नियोजन करूनच प्रतिमा यांची हत्या करण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे.
यापूर्वी प्रतिमा रामनगर जिल्ह्यात सेवा बजावत होत्या. कर्तव्यनिष्ठ आणि प्रामाणिक अधिकारी अशी त्यांची ओळख होती. मागील आठ वर्षांपासून त्यांचे बेंगळूरमधील दो•कल्लसंद्र येथे वास्तव्य होते. मुलाला भेटण्यासाठी त्या अधूनमधून तीर्थहळ्ळीला जात होत्या. हत्येचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. ही घटना पूर्वनियोजित असल्याचे दिसून आले आहे. घटनास्थळी पोलिसांनी भेट देऊन पंचनामा केला. प्रतिमा यांचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी किम्स इस्पितळात पाठवून देण्यात आला आहे. मारेकऱ्यांचा शोध घेण्यासाठी पोलिसांची तीन पथके नेमण्यात आली आहेत, अशी माहिती बेंगळूर दक्षिण विभागाचे डीसीपी राहुलकुमार शहपूरवाड यांनी दिली.