मराठी-इंग्रजी फलकांवर फिरविला ‘ब्रश’
महापालिकेकडून पुन्हा इतर भाषिक फलकांवर वक्रदृष्टी : मनपा आयुक्त शुभा बी. यांच्या धोरणाबाबत तीव्र संताप
बेळगाव : राज्योत्सव दिनाच्या धास्तीने महापालिकेकडून पुन्हा एकदा शहरातील दुकानदारांवर दांडगाई करत मराठी आणि इंग्रजी भाषेतील अक्षरे पुसण्यात आली. ज्या मार्गावरून राज्योत्सव मिरवणूक काढली जाते त्या मार्गावरील विविध व्यापारी आस्थापनांवरील मराठी व इंग्रजी भाषेतील फलकांवर ब्रश फिरविण्यात आला. नियमानुसार 60 टक्के कन्नड भाषेतील अक्षरे लिहूनदेखील उर्वरित मराठी व इंग्रजी भाषेतील अक्षरांवर रंग लावण्यात आल्याने व्यापाऱ्यांतून तीव्र विरोध करण्यात आला. मात्र कन्नडधार्जिण्या मनपा आयुक्त शुभा बी. यांनी विरोध डावलून ही कारवाई केली.
सरकारी कार्यालयामध्ये कन्नड भाषेचा वापर वाढवावा तसेच कन्नडलाच प्राधान्य देण्यात यावे, असा आदेश यापूर्वीच बजावण्यात आला आहे. मात्र या आदेशाचा चुकीचा अर्थ काढत ज्या ठिकाणी कन्नड व इंग्रजी भाषेतील नामफलक आहेत ते हटविण्यासाठी महापालिकेची धडपड सुरू आहे. सरकारने बजावलेल्या आदेशात इतर भाषेतील फलक काढण्यासंदर्भात कोठेही सूचना करण्यात आलेली नाही. त्यामुळे सुरु असलेली बेकायदेशीर कारवाई तात्काळ थांबवावी यासाठी अॅड. अमर येळ्ळूरकर यांच्यासह माजी नगरसेवकांनी मनपा आयुक्त शुभा बी. यांची भेट घेऊन मागणी केली होती. पण त्या मागणीकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे.
कन्नड संघटनांच्या धास्तीने गुरुवारी दुपारी चन्नम्मा सर्कलपासून काकतीवेस, शनिवार खूट, गणपत गल्ली आदी मार्गावरील मराठी व इंग्रजी भाषेतील अक्षरावर ब्रश फिरवून रंग लावण्यात आला. या कारवाईला व्यापाऱ्यांनी जोरदार विरोध केला. मात्र कन्नडधार्जिण्य मनपा आयुक्त शुभा बी. यांनी विरोध डावलत कारवाई सुरुच ठेवली. मनपा आयुक्त म्हणून शुभा बी. रुजू झाल्यापासून त्यांनी कन्नड भाषेला अधिक प्राधान्य दिले आहे. इतर भाषांचा तिरस्कार करणाऱ्या आयुक्तांच्या या धोरणाबाबत तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. यावेळी आरोग्य अधिकारी डॉ. संजीव नांद्रेदेखील उपस्थित होते. कारवाईला विरोध होईल या भीतीने पोलीस बंदोबस्तही घेण्यात आला होता.