भाऊंची आमराई...
आजोळच्या घरी आंबे खायला मे महिन्याच्या सुट्टीत जायचं ही अगदी काळया दगडावरची रेघ ठरलेली असायची. त्याच्यामध्ये कोणतीही अडचण येऊन चालायचं नाही. आजारपणा असू दे, दुष्काळ असू दे आम्ही आपले आजीच्या गावी जायला निघायचो. खरं तर आंबे आमच्याही गावाला मिळत होते, आमच्याही घरची शेतीवाडी होतीच. पण आजोळी जाऊन आंबे खाण्याची जी काही मजा असते, जे काही कौतुक असतं ते इथे मात्र नक्की नाही. आजोळी गेल्यानंतर अंगणासारखंच आजीसुद्धा हात पसरून आपलं जेव्हा स्वागत करते, त्यावेळेला मन अगदी भरून येतं. तिथली प्रत्येक गोष्ट ही हवीहवीशी वाटते. कारण त्यामागे एका वेगळ्याच मायेचा स्पर्श असतो. घरात आल्यानंतर सगळं सामान इकडे तिकडे टाकलं, पसारा केला की अंगणामध्ये पळापळी आरडा ओरडा सुरू. येणारे जाणारे कौतुकाने विचारायचे लेकी आल्या वाटतं माहेरपणाला. आजीच्या अंगावर मूठभर मांस चढायचे. दुपारी चारनंतर आमराईत जाण्याचा कार्यक्रम हमखास असायचा. खरंतर या गावात अनेक ठिकाणी आंब्याची झाडं आम्हाला दिसायची, परंतु भाऊंची आमराई आम्हाला मात्र फार आवडायची. इथे गेल्यानंतर प्रत्येक झाडाला वेगवेगळ्या पुरूषांची नावे दिलेली असायची. त्याची मला फार गंमत वाटायची. नावं वाचताना आणि त्या झाडाजवळ उभं राहताना एक वेगळाच भाव मनामध्ये निर्माण व्हायचा. मग आजी आमची गोष्ट सांगायला सुरुवात करायची. पूर्वीच्या काळी मुलीचे लग्न म्हटलं की आंबा शिंपण्याची प्रथा होती. आमचं गाव अतिशय दुष्काळी. त्यामुळे आंबा लावणार कुठे आणि तो वाढणार कधी असाही प्रश्न असायचा. मग शेवटी गावातल्या सगळ्या मंडळींनी एकत्र येऊन एक विचार केला आणि ही भाऊंची आमराई तयार झाली. लग्नामध्ये मुलगी जो आंबा शिंपायची त्या आंब्याचं रोप लावायचं, ही लावणी मुलीने एकटीने करायची नसते, तर हा आंबा शिंपल्यानंतर मुलीचा होणारा नवरादेखील हा आंबा किंवा हे आंब्याचे रोप घेऊन या आमराईमध्ये येतो आणि मुलीच्यासाठी म्हणजे होणाऱ्या बायकोसाठी, पाच आंब्याची झाडं लावतो. नुसतीच तो ती झाडं लावत नाही तर त्या आंब्याच्या रोपांची काळजी घेणं, ती वाढवणं अगदी फळ येईपर्यंत ही सगळी काळजी घेण्यासाठी लागणारा खर्च तो सासऱ्याला देतो. अशा प्रथा राजस्थानमध्ये सुद्धा अनेक गावांमध्ये आहेतच. त्यामुळे आपोआपच गावामधली वृक्षांची संख्या वाढते, हिरवेपणा येतो आणि दुष्काळही कमी होतो. हे गणित त्यावेळी मांडले गेल्यामुळे या आमराईला फार मोठे महत्त्व आहे. आंब्याची झाडं ज्या ठिकाणी लावली जायची त्या ठिकाणी त्याला भाऊची आमराई असं म्हटलं जातं. आंबा म्हणजे आपल्या पाठचा भाऊच असं समजून त्याची काळजी घेतली जायची. लहानपणी भावाशी खेळताना आंब्याभोवती फेर धरून नाचणं, आंब्याच्या मागे जाऊन लपणं, आंब्याच्या झाडावरती लोंबकळणं, फांदीवर जाऊन बसणं, हे सगळे खेळ आवडीने खेळले जायचे. म्हणूनच हे झाड किंवा हा आंबा मुद्दामच भाऊच्या नावाने केला जायचा. याच्यामध्ये दुसरेही कारण असं की ज्या पाठच्या भावासाठी हे आंबे लावले जायचे, ते आंबे खायला आजोळी मुलांनाही आनंदाने येता यावं, मुलीला साडीचोळी करता यावी, माहेरवाशीणीचे स्वागत व्हावं. या सगळ्या प्रथा एकमेकांशी अगदी घट्ट जोडलेल्या आहेतच. म्हणूनच या आमराईत आलं की आईला तिचं माहेर गवसायचं, सगळं लहानपणच भेटीला यायचं. प्रत्येक मुलीला हा आंबा म्हणजे आपला भाऊ वाटतोच आणि आम्हा सगळ्यांना हवाहवासा मामादेखील मिळतो. भाऊ असो अथवा नसो या गावात प्रत्येक मुलीच्या भावाच्या नावानं पाच आंब्याची झाडं लावल्यामुळे आता हे गाव आंबा निर्यातीसाठी अगदी प्रसिद्ध आहे. अशी भाऊंची वाडी प्रत्येक गावात तयार व्हावी हीच मनोमन इच्छा.